दापोलीच्या आपटी गावातील शेतकऱ्याची कृ षी पुरस्कारापर्यंत गरुडझेप

By Admin | Updated: July 1, 2015 00:34 IST2015-07-01T00:34:16+5:302015-07-01T00:34:16+5:30

महाराष्ट्र कृषी दिन विशेष

The farmer's farmyard in Dapoli's Apati village, Gurdupa | दापोलीच्या आपटी गावातील शेतकऱ्याची कृ षी पुरस्कारापर्यंत गरुडझेप

दापोलीच्या आपटी गावातील शेतकऱ्याची कृ षी पुरस्कारापर्यंत गरुडझेप

शिवाजी गोरे -दापोली  कुटुंब गरीब असल्याने कष्ट केल्याशिवाय चुलच पेटत नव्हती. अशा प्रतिकूल परिस्थितीत बीएससीपर्यंतचे शिक्षण घेऊन मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. परंतु गावची ओढ स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे मुंबईतील नोकरी सोडून गावातील ३ गुंठे जमिनीत हाताने खोदून भात लागवड केली. घरच्या गरिबीमुळे बैल व नांगर नव्हता. परंतु कष्ट करण्याची जिद्द होती. या जिद्दीच्या जोरावर वसंत गायकवाड व त्यांची पत्नी लक्ष्मी गायकवाड यांनी ३ गुंठे जमिनीत खणतीने खोदून भातशेती केली. भातशेतीचे पीक घेतल्यानंतर भाजीपाला लागवड केली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. शेतमजूर ते प्रगतशील शेतकऱ्यापर्यंत गरुडझेप घेतली.
मोठी झालेली माणसे आपल्या कष्ट व जिद्दीमुळे नावारुपाला येतात. क्षेत्र कोणतेही असो कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळते, हे आपटी येथील शेतमजूर वसंत गायकवाड यांनी सिद्ध करुन दाखविले आहे. शेतीत कष्ट करायला कोणीही तयार नाही. त्यामुळे अनेक तरुण मुंबईला चाकरमानी म्हणून जाऊ लागले आहेत. परंतु याला गायकवाड अपवाद आहेत. बीएसस्सीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर सरकारी नोकरी शोधणे किंवा मुंबईत चाकरमानी म्हणून राहण्याऐवजी त्यांनी आपल्या गावचा रस्ता धरला. आपल्याच शेतीत कष्ट करुन सुखी समृद्ध जीवनाचा मार्ग स्वीकारला. पत्नीनेसुद्धा त्यांना समर्थ साथ दिली. शेती हाच व्यवसाय स्वीकारल्यानंतर शेतीत कष्ट करुन मजूर ते प्रगतशील शेतकरी असा त्यांचा यशस्वी आणि समाधानकारक प्रवास सुरु आहे.
वडिलोपार्जीत ३ गुंठे शेतीपासून शेतीची सुरुवात झाली. सुरुवातीला नांगर नसल्याने हाताने खोदून शेती करावी लागली. तळहातावर आलेल्या जखमा फार वेदनादायी होत्या. गावातील लोकसुद्धा त्यांना वेडा ठरवत होते. चांगली नोकरी करण्याऐवजी शेतीत राबून काय मिळणार, हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून ऐकावा लागत होता. परंतु अशाही परिस्थितीत शेती करणे सोडायचे नाही, ही खुणगाठ मनाशी बांधली व शेतीत प्रगती करण्याचे ठरविले. कष्टमय जीवनातून मिळणारा आनंद सुखद आहे. कष्ट केल्याने माणूस परिपक्व होतो, हेच यातून शिकल्याची त्यांची भावना आहे.
तीन गुंठ्यांत व्यावसायिक शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यानंतर या ३ गुंठ्यांत बाराही महिने पीक घेण्याचा प्रयत्न सुरु केला. सुरुवातीला भातशेती, पालेभाज्या, कलिंगड, भेंडी, मिरची, घेवडा, कारली, काकडी, दोडका, पडवळ, दुधी भोपळा, टोमॅटो, मेथी, पालक, मुळा, माठ, कोथिंबीर, चवळी, तूर, पावटा, कुळीथ ही पिके आलटूनपालटून घेत गेले. शेतीत कष्टातून पिकवलेली भाजी लक्ष्मी गायकवाड डोक्यावर घेऊन वाडीवाडीत फिरून विकायच्या. दोघे पती-पत्नी दिवसातील १० ते १२ तास शेतीत राबू लागले. त्याच्या कष्टाला यश आले. त्या कष्टातून अडीच एकर शेती विकत घेतली व खऱ्या अर्थाने शेतीला व्यावसायिक रुप दिले.
अडीच एकर शेतीतील काही भाग पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, कंदपिके, काकडी, मका, कलिंगड, गाजर, विविध पिके आलटूनपालटून घेण्यात येऊ लागली. १२ महिने तीन हंगामात पीक घेण्याचा विक्रम त्यानी केला आहे. १२ महिने शेतीतून उत्पन्न घेऊन व्यावसायिक शेतीत त्यांनी आपल्या शिक्षणाचा पुरेपूर वापर केला आहे. शासनाच्या कसल्याही अनुदानाची वाट न पाहता स्वत:च्या शेतीला कुंपण, एरिगेशन, पाईपलाईन, ठिबक सिंचन, बांध, शेतीचे सपाटीकरण केले आहे. कधीकाळी ३ गुंठे शेतीला डोक्यावरुन हंड्याने वाहून पाणी देणाऱ्या या शेतकऱ्याने वीजपंप बसवून शेती स्वयंपूर्ण केली आहे.
गायकवाड दाम्पत्याचा दिवस ४ वाजता उजाडतो. पहाटे चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत त्यांचा दिनक्रम सुरुच असतो. सकाळी उठल्यावर गायीचे दूध, शेण काढणे, त्यानंतर शेतीला पाणी मशागत, लक्ष्मी गायकवाड सकाळी घरातील कामे उरकून ७ वाजता दापोली एस. टी. स्टॅण्डजवळील गोडाऊनसमोर रस्त्याच्या कडेला बसून शेतातील भाजी - फळे, कंदमुळे विकतात. यश मिळूनसुद्धा त्यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. वसंत गायकवाड शेतीतील कामे स्वत: करतात. बाजारात विक्रीची कामे लक्ष्मी गायकवाड करतात. एकमेकांच्या साथीने दोघांच्या कष्टातून गायकवाड दाम्पत्याचा आपटी येथे मळा फुलला आहे. शेतीत त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली. त्यांच्या कष्टाला यश आले. २०१३चा महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. कष्टाच्या जोरावर राज्य शासनाच्या पुरस्कारापर्यंत मजल मारलेल्या या शेतकऱ्याला सलाम करायला हवा. गायकवाड यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्श अन्य शेतकऱ्यानी घेतल्यास अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज व्हायला वेळ लागणार नाही.
 

Web Title: The farmer's farmyard in Dapoli's Apati village, Gurdupa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.