माणसंं मेली तरी चालतील, आम्ही भांंडतच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:19+5:302021-05-25T04:35:19+5:30
कोरोना महामारीमध्ये अनेक माणसं मेली. अनेक कुटुंबीयांचे होत्याचं नव्हतं झालं. कुणाचा पती गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाची मुलगी ...

माणसंं मेली तरी चालतील, आम्ही भांंडतच राहणार
कोरोना महामारीमध्ये अनेक माणसं मेली. अनेक कुटुंबीयांचे होत्याचं नव्हतं झालं. कुणाचा पती गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाची मुलगी गेली तर कुणाचे आई-वडील गेले. तर अनेक ठिकाणी अख्खे कुटुंबच कोरोनामुळे बळी गेले. त्यामुळे आज प्रत्येक गावात कोरोनामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्या मुलांच्या भवितव्याचे काय, असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. काही कुटुंबीयांची अशीही परिस्थिती आहे की वडील गेल्याची मुलाला कल्पना नाही तर पती गेल्याची त्यांच्या पत्नीला कल्पनाच नाही, अशी भयानक स्थिती आज पहावयास मिळत आहे. रत्नागिरीतील एका कुटुंबात तर आई, वडील, मुलगा आणि मुलगी अशी चारही माणसं कोरोनाने हिरावून घेतल्याने त्या कुटुंबाने करावयाचे काय. कल्पनाच करता येणार नाही, अशी परिस्थिती अनेक कुटुंबीयांवर ओढवली आहे. हे दु:ख कोणाला सांगणार. माणसं मेली तरी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला नातेवाईकही पुढे येत नाहीत. प्रसंग कधी तरी आपल्यावरही येईल, असा विचारही करायला कोणी तयार नाहीत. कोरोनामुळे माणुसकीही हरवली आहे, असेच म्हणावे लागत आहे.
कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या संपूर्ण कुटुंबीयांची तर त्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे. वडील कोरोनाने पॉझिटिव्ह झालेले असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलगा, सून अचानक आजारी पडतात. त्यानंतर होणारी ससेहोलपट ही फार वाईट असते. कारण वडील रुग्णालयात, त्यांची सेवा करणाऱ्या चिरंजीवालाही कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या मदतीसाठी कोण धावणार. तसेच त्या वडिलांना जेवण घेऊन जाणाराच जागेवर पडल्याने त्या कुटुंबाची काय अवस्था असेल ही परिस्थिती विचार करण्यापलीकडची आहे. त्यामुळे कोरोनामुळे फार दयनीय अवस्था निर्माण झाली आहे, हे न सांगण्यासारखे सत्य आहे. याची जाणीव राजकारण्यांना व्हायला पाहिजेत. कारण ते लोक जीव गमवावत असतानाच हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. सर्वांनाच असे म्हणता येणार नाही. पण जास्तीत जास्त राजकीय मंडळी कुरघोड्या करण्यापलीकडे काही करीत नाहीत, असे चित्र पहावयास मिळत आहे.
कोरोना महामारी, चक्रीवादळ या गोष्टी काही राजकारण्यांसाठी नव्या राहिलेल्या नाहीत. यामध्ये राजकारण आणून केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापलीकडे काहीही काम करीत नाहीत. काही राजकारणी या महामारीमध्येही खालच्या थराचे राजकारण करीत आहेत. आपण स्वत: काही करायचं नाही आणि दुसरा कोणी काम करीत असेल त्याच्या तंगड्या खेचण्यातच धन्यता मानणाऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यामुळे लोक मरताहेत, त्यांना वाचविण्यासाठी काही करण्याऐवजी घरी बसून नुसताच तमाशा पहावयाचा आणि नंतर त्याचा बाऊ करायचा, असा काहीसा प्रकार सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या रुग्णांसाठी काहीतरी करावे, त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करावा तसेच त्या रुग्णांना चांगली सेवा देण्याची धडपड करण्याची गरज आहे. पण परिस्थिती उलट आहे. लोक मेले तरी चालतील, पण आपण भांडतच राहू, आरोप करू, त्यातून काही निष्पन्न नाही झाले तरी चालेल, याला काय म्हणावे. माणुसकी मेली की जिवंत आहे?