दुर्लक्षित ‘छावा’ अजूनही उपेक्षितच; भूमिपूजनानंतर तब्बल ३६ वर्षांनीही संभाजी महाराज यांचे स्मारक अर्धवट स्थितीतच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:33 IST2025-02-26T13:33:00+5:302025-02-26T13:33:00+5:30
स्मारकाच्या जागेबाबत मतेमतांतरे?

छाया- तन्मय दाते
रत्नागिरी : महापराक्रमी आणि प्रचंड धर्माभिमानी छत्रपती संभाजीराजे वर्षानुवर्षे दुर्लक्षितच राहिले. त्यांच्या वाट्याची ही उपेक्षा आजही कायम आहे. तब्बल ३६ वर्षे त्यांच्या स्मारकाचे रेंगाळले आहे. आजवर त्यासाठी फक्त निधीच्या घोषणा झाल्या, लाखो रुपये खर्च झाले. मात्र, तरीही हे स्मारक काही उभे राहिलेले नाही. आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची चर्चा सुरू झाली असताना तरी हे स्मारक उभे राहील, अशी अपेक्षा केली जात आहे.
आपल्या अखेरच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांचा मुक्काम आताच्या कसबा (ता. संगमेश्वर) या भागात होता. तेथीलच एका वाड्यात त्यांना पकडण्यात आले. खरे तर त्याच जागेत शंभूराजेंचे स्मारक होणे अपेक्षित होते. मात्र, १९८९ साली कसबा ते संगमेश्वर यादरम्यान पैसा फंड हायस्कूलनजीक डोंगरात जागा घेऊन तेथे स्मारक करण्याचे निश्चित करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत या स्मारकासाठीचे भूमिपूजन झाले. त्यानंतर पुढील सुमारे १२/१३ वर्षे त्यावर काही लाख रुपये खर्चही झाले. मात्र, ते स्मारक आजही पूर्ण झालेले नाही.
सद्य:स्थितीत या इमारतीची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. ही जागा डोंगरात असल्याने तेथे कोणाचे जाणे-येणे नाही. त्यामुळे चुकीच्या गोष्टींसाठी या इमारतीचा वापर होत असल्याचा आक्षेप ग्रामस्थ घेतात. आता महामार्गाच्या रुंदीकरणामुळे ही जागा किमान दृष्टीस पडू लागली आहे. मात्र, ‘भव्य’ स्मारकाच्या घोषणांनंतर उभी राहिलेली इमारत आणि त्याची आजची अवस्था अत्यंत दयनीय आहे.
स्मारक समितीवर नेमके कोण होते?
३६ वर्षांपूर्वी जेव्हा स्मारकासाठी भूमिपूजन झाले, तेव्हा स्मारक समिती नेमण्यात आली होती. मात्र, त्यात स्थानिकांची संख्या फारशी नव्हती. बाहेरील लोकांचाच त्यात भरणा अधिक होता. स्मारकामध्ये काय असेल, याचा नेमका आराखडा निश्चित होता की नाही, याबाबतही आजच्या स्थानिकांना माहिती नाही. त्यामुळे येथे काय केले जाणार होते, त्याचा पाठपुरावा कोणाकडे आणि कसा करायचा, याबाबत स्थानिक लोक अनभिज्ञ आहेत. या समितीने नेमका काय पाठपुरावा केला, याबाबतही कोणाला माहिती नाही.
स्मारकाच्या जागेबाबत मतेमतांतरे?
पकडले जाण्याआधी छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य जेथे होते, त्या भागात त्यांचे स्मारक व्हावे, अशी बहुतेकांची अपेक्षा आहे. आजही कसबा येथे कोणी शंभूप्रेमी येतात, तेव्हा त्यांना त्या जागेची ओढ असते. तेथील माती आपल्या कपाळावर लावण्यासाठी ते अधिक आतूर असतात; पण सरकारने स्मारकासाठी निश्चित केलेली जागा तेथून लांब आहे. ही जागा का निवडण्यात आली, याबाबतही आता कोणाला माहिती नाही.
घोषणांचे स्मारक
- आतापर्यंत या स्मारकाबाबत अनेकांनी घोषणा केल्या आहेत. मुळात भव्य स्मारकाची घोषणा करूनच १९८९ साली येथे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर अनेकांनी या स्मारकाविषयी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.
- लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी भाजपचे नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी या स्मारकासाठी २०० कोटी रुपये निधी आणण्याची घोषणा केली होती; पण पुढे काहीही झालेले नाही.
- अलीकडेच १९ फेब्रुवारीला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कसबा येथे दिलेल्या भेटीत भव्य स्मारकाची घोषणा केली आहे. प्रसंगी सक्तीच्या भूसंपादनाची तयारीही त्यांनी केली आहे. मात्र, मुळात स्थानिकांशी कोणी चर्चाच केलेली नाही.