मिरकरवाडा बंदरातील बंद नौका तातडीने बाहेर काढा, मंत्री उदय सामंतांनी दिले निर्देश
By अरुण आडिवरेकर | Updated: September 20, 2022 16:58 IST2022-09-20T16:57:08+5:302022-09-20T16:58:19+5:30
वर्षानुवर्षे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मच्छीमारी नौका तातडीने बाहेर काढा

मिरकरवाडा बंदरातील बंद नौका तातडीने बाहेर काढा, मंत्री उदय सामंतांनी दिले निर्देश
रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरात बुडालेल्या नौकांचे अवशेष, वर्षानुवर्षे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मच्छीमारी नौका तातडीने बाहेर काढा, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदरातील समस्यांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (दि. १७) मिरकरवाडा बंदराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सोहेल साखरकर, नुरा पटेल, विकास सावंत, रोशन फाळके, ओंकार मोरे व मच्छिमार बांधव उपस्थित होते. मिरकरवाडा बंदराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता आहे. याबाबत सातत्याने मच्छिमारांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. याबाबत मंत्री सामंत यांनी संवाद साधला.
बंदरात अनेक जुन्या नौका उभ्या करुन ठेवण्यात आलेल्या आहेत. काही नौकांचे अवशेष बुडालेले आहेत. त्या बाहेर काढल्या तर जेटीजवळ नियमित नौका उभ्या करण्यासाठी जागा होऊ शकते. यासाठी मत्स्य विभागाकडून पावले उचलणे आवश्यक आहे, अशी माहिती मच्छिमारांनी यावेळी दिली.
बंदरामध्ये एकाचवेळी नौका उभ्या करताना किंवा समुद्रात मासेमारीसाठी नेताना अनेकवेळा अडचण होते. काहीवेळा नौका बाहेर काढण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. हे टाळण्यासाठी विना वापर नौका किंवा त्यांचे अवशेष काढून टाकणे गरजेचे असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. त्या नौका काढून टाकण्यासासाठी कार्यवाही करा, अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी मच्छिमारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवा, अशीही सूचना मंत्री सामंत यांनी यावेळी केली.