Ratnagiri: राजापूर तालुक्यातील अनेक गावांत अनोळखी व्यक्ती, फेरीवाले, भंगारवाल्यांना प्रवेशबंदी; कारण काय.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:43 IST2025-12-20T13:43:33+5:302025-12-20T13:43:46+5:30
वेशीवर लावले फलक, प्रशासन काय करणार?

Ratnagiri: राजापूर तालुक्यातील अनेक गावांत अनोळखी व्यक्ती, फेरीवाले, भंगारवाल्यांना प्रवेशबंदी; कारण काय.. वाचा
राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील महिलेचा खून, कोळवणखडी येथील घरफोडी आणि अनेक दिवस उलटूनही आरोपी न सापडणे यांसारख्या घटनांमुळे तालुक्याच्या पूर्व भागात भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून गावामध्ये येणारे फेरीवाले, भंगारवाले, भोंदू बाबा यासह अनोळखी व्यक्तींना गावामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. जर अशा व्यक्ती गावात आढळल्यास तत्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, असा इशारा देणारा फलक बुधवारी गावांच्या वेशीवर लावण्यात आला आहे.
कोरोना काळात सामाजिक अंतर राखण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या काळात गावात कोणीही प्रवेश करू नये, यासाठी गावांच्या वेशीवर प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले होते. आता तशी स्थिती नसली तरी चोऱ्या, खून यांसारख्या प्रकारांमुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांनी अनोळखी लोकांना गावात प्रवेश नाकारला आहे.
रायपाटण येथील वैशाली शेट्ये या महिलेचा खून होऊन दोन महिने झाले आहेत. कोळवणखडी येथे घरफोडीची घटना घडली आहे. याव्यतिरिक्त तालुक्याच्या काही भागात घरफोड्यांचे प्रकार घडले आहेत. या वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसरातील येळवण, कोळवण खडी, रायपाटण, तळवडे यासह अनेक गावांत तेथील ग्रामपंचायतींनी गावात प्रवेश करणाऱ्या अनोळखी व्यक्ती, फेरीवाले, भंगारवाले, भोंदू बाबा यांना गावात प्रवेश करण्यास सक्त मनाई करणारे फलक लावले आहेत.
प्रशासन काय करणार?
गावामध्ये असा प्रवेश नाकारणे कायद्याला धरून नसल्याने आता तालुका प्रशासन, पोलिस काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.