महावितरण प्रशासनाच्या एकतर्फी धोरणाविरोधात रत्नागिरीत अभियंत्यांचे आंदोलन
By मेहरून नाकाडे | Updated: April 29, 2025 13:30 IST2025-04-29T13:29:39+5:302025-04-29T13:30:08+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्रात वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महावितरण , महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील अभियंतेसुध्दा आपले कर्तव्य निष्ठेने पार ...

महावितरण प्रशासनाच्या एकतर्फी धोरणाविरोधात रत्नागिरीत अभियंत्यांचे आंदोलन
रत्नागिरी : महाराष्ट्रात वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील अभियंतेसुध्दा आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेत. या अभियंत्यांचे नेतृत्व करणारी सब-ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन (SEA) ही संघटना अभियंत्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहे. या संघटनेने महावितरण प्रशासनाच्या एकतर्फी आणि अपारदर्शी धोरणांविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.
शहरातील कोकण परिमंडल कार्यालयासमोर सर्व अभियंत्यांनी एकत्रित येत आंदोलन केले.
सब-ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे रत्नागिरीतील सहसचिव नबील मोंगल यांनी, महावितरणातील बदली धोरण, कर्मचारी भरती, स्टाफ सेटअप आणि कंपनीच्या पुनर्रचनेबाबत प्रशासन एकतर्फी निर्णय घेत आहे. यामध्ये अभियंत्यांना विश्वासात घेतले जात नाही, तसेच पारदर्शक धोरणांचा अवलंब केला जात नाही. याचा परिणाम केवळ अभियंत्यांवरच नव्हे, तर वीज ग्राहकांवरही होणार आहे. याविरोधात संघटनेने अभिनव आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात अभियंत्यांनी अतिरिक्त कार्यभार सोडणे, महावितरणच्या मोबाइल क्रमांकावरील कॉल कार्यकारी अभियंत्यांच्या क्रमांकावर डायव्हर्ट करणे, प्रशासनाचे व्हॉट्सअॅप ग्रुप सोडणे, तसेच पेन डाऊन आणि कॉम्प्युटर डाऊन आंदोलनाचा समावेश असल्याचे सांगितले.
रत्नागिरीत वर्षानुवर्षे अभियंत्यांच्या रिक्त जागा असून, या जागांचा अतिरिक्त कार्यभार इतर अभियंत्यांवर टाकला जात आहे. आता या आंदोलनात अभियंत्यांनी हा कार्यभार सोडला आहे. तसेच, प्रशासनाला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी यासाठी कॉल डायव्हर्टचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे, हे आंदोलन ग्राहकांविरोधात नाही मात्र वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी अभियंते रात्रंदिवस कार्यरत असल्याचे संघटनेचे सहसचिव मोंगल यांनी सांगितले.
या आंदोलनात रत्नागिरी, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, लोटे आदी तालुक्यांतील शंभरपेक्षा जास्त अभियंते सहभागी आहेत. संघटनेने वीज ग्राहकांना या आंदोलनात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रशासनाने अभियंत्यांच्या मागण्या मान्य करून पारदर्शक धोरणे राबवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.