खार बंधार्यांवरील ऊर्जा निर्मिती स्वप्नच प्रस्ताव धूळ खात
By Admin | Updated: May 31, 2014 01:11 IST2014-05-31T01:05:02+5:302014-05-31T01:11:14+5:30
गावडेआंबरे,चाफेरींची निवड

खार बंधार्यांवरील ऊर्जा निर्मिती स्वप्नच प्रस्ताव धूळ खात
रहिम दलाल / रत्नागिरी तालुक्यातील दोन खारलँड बंधार्यांवर अपांरपरिक ऊर्जा तयार करण्याचा खारलँड विभागाचा प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे. अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यासाठी लागणार्या उपकरणांसाठी येणारा खर्च कोण करणार, असा प्रश्न या विभागाला सतावत आहे. जिल्ह्यात कोयना, रत्नागिरी गॅस, जिंदाल, फिनोलेक्स असे वीज तयार करणारे मोठे प्रकल्प आहेत. अर्थात राज्याची गरज उत्पादनापेक्षा अधिक असल्याने विजेची कमतरता नेहमीच भासते. त्यावर पर्याय म्हणून खारलँडडने जिथे बंधारे घातले आहेत, तेथे ऊर्जानिर्मितीचा प्रस्ताव आहे. जिल्ह्यात १७१ खारलँड बंधारे बांधण्यात येणार असून, आतापर्यंत ६९ खारलँड बंधारे बांधण्यात आले आहेत़ त्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी : मंडणगड-४, दापोली-४, खेड-८, चिपळूण-९, गुहागर-२, रत्नागिरी-२७, लांजा-१, राजापूर-१४ आहेत़ तर आणखी १२ खारलँड बंधार्यांची कामे सुरु आहेत़ समुद्राच्या लाटांच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये प्रयत्न करण्यात आला होता. आता शासनाच्या खारलँड विभागानेही अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे व ्नचाफेरी कासारी या गावांची निवड केलेली आहे. या बंधार्यांमध्ये समुद्राचे पाणी वेगात आतमध्ये शिरत असल्याने त्याचा फायदा घेण्यात येणार आहे. गावडेआंबेरे खारलँड बंधार्याला ६५ झडपे, तर चाफेरी कासारी खारलँड बंधार्याला २२ झडपे आहेत. या दोन्ही खारलँड बंधार्यांच्या प्रत्येकी दोन झडपांचा वापर अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे. दिवसांतून २ वेळा भरती व २ वेळा ओहोटीच्या फायदा घेऊन ४ किलोवॅट अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यात येणार आहे. ही ऊर्जा तयार करण्यापूर्वी या बंधार्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार होते. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मेढाकडे पाठविण्यात येणार होता. त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली होती. मात्र, ही तयारी करीत असतानाच ही ऊर्जा तयार करण्यासाठी सुरुवातीला त्यासाठी लागणार्या उपकरणांसाठी खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. तो खर्च खारलँड विभागाला परवडणारा नाही. त्यामुळे हा खर्च कुठून करावा, असा प्रश्न खारलँड विभागासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे आता अपारंपरिक ऊर्जा तयार करण्याचा प्रस्ताव कागदावरच राहिला असून तो बारगळला आहे.