‘कुणीतरी आहे तिथे...’ ने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

By Admin | Updated: January 2, 2016 08:29 IST2016-01-01T21:03:48+5:302016-01-02T08:29:26+5:30

रत्नागिरीतील डॉक्टरांचा सहभाग : आपल्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी एका नाटकाचे सादरीकरण

The eagerness of the audience that 'there is somebody ...' | ‘कुणीतरी आहे तिथे...’ ने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

‘कुणीतरी आहे तिथे...’ ने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

रत्नागिरी : रूग्णसेवेबरोबरच स्वत:च्या कलागुणांना वाव देत इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेच्या येथील डॉक्टर मंडळींनी ‘कुणीतरी आहे तिथे..’ हे सुरेश खरे लिखित दोन अंकी नाटक सादर केले. आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने संस्था दरवर्षी एखादे नाटक सादर करते. यावर्षीही डॉ. शशांक पाटील दिग्दर्शित ‘कुणीतरी आहे तिथे’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.सरदार जगतापांच्या मृत्यूनंतर २० वर्षांनी त्यांच्या इच्छेनुसार मृृत्यूपत्राच्या वाचनाचा कार्यक्रम त्यांच्याच शहरापासून दूर असलेल्या जुन्यापुराण्या वाड्यात ठेवलेला असतो. त्यांना मूलबाळ नसल्याने ही २० कोटींची मालमत्ता कोणत्या नातेवाईकाला मिळणार, ही उत्सुकता सर्वाना असते. त्यामुळे त्यांचे आणि पत्नीचे भाचे, पुतणे - पुतण्या रात्री एकत्र जमतात. त्या रात्री दिवे गेलेले असतात व बाहेर पाऊस पडत असतो. प्रथम सॉलिसीटर प्रधान (डॉ. रवींद्र गोंधळेकर) तिथे येतात. त्यांचे स्वागत अस्ताव्यस्त दाढी वाढलेला, एक पाय ओढत चालणारा, गूढ बोलणारा वृद्ध रामशरण कंदिलाच्या उजेडात प्रकाश करतो.
ही भूमिका दिग्दर्शक डॉ. शशांक पाटील यांनी सादर केली. मृत्यूपत्राच्या वाचनानंतर ही मालमत्ता सरदारांची पुतणी पद्मा (डॉ. मेधा गोंधळेकर) हिला मिळते. मृत्यूपत्रात आणखी एक अट असते, पद्मा वेडी ठरली, तर ही इस्टेट दुसऱ्या पाकिटात नाव असलेल्या व्यक्तिला मिळेल. हे पाकिट प्रधान आपल्याकडेच ठेवतात. बरीच रात्र झाल्याने रात्र इथेच काढावी, असं सर्वजण ठरवतात आणि कॉफी घेण्यासाठी ते सारे कीचनमध्ये जातात. येथूनच खऱ्या भयनाट्याची सुरूवात होते. पद्माशी बोलणारे प्रधानसाहेब मागच्या मागे गायब होणे, भिंत सरकून अचानक हात बाहेर येतो आणि तो पद्माचा हार घेऊन जातो. मेंटल हॉस्पिटलचा रखवालदार मोहिते (डॉ. दत्तप्रसाद केतकर) हॉस्पिटलमधून खुनी वेडा- पळाल्याचे सांगतो. ताण वाढत जातो. इतक्यात वेडा डॉक्टर (डॉ. मयूर कांबळे) येतो. तो पद्माला वेडा ठरवण्याचा प्रयत्न करतो. यातच सुरेखाचा (डॉ. माधुरी पेवेकर) खून होतो. तिची बहीण लिली (डॉ. दीपा पावसकर) गायब होते. बंगल्याच्या आवारात मोहितेचे प्रेत सापडते. खुनी कोण, पद्माला वेडी ठरवण्याचा प्रयत्न कोण करत असतं. तिच्यावर प्रेम करणारा देखणा शेखर (डॉ. अतुल देशपांडे), तिरसट चंद्रकांत (डॉ. नितीन चव्हाण) की भोळसट मनोहर (डॉ. मतीन परकार)? एकापाठोपाठ घडणाऱ्या या अनाकलनीय घटनांमुळे उत्कंठा वाढवण्यात डॉ. शशांक पाटील कमालीचे यशस्वी ठरले आहेत. डॉ. माधुरी पेवेकर, डॉ. मयूर कांबळे आणि डॉ. मतीन परकार यांनी पदार्पणातच चांगली छाप पाडली आहे. डॉ. मेधा गोंधळेकर यांनी पद्मा पूर्ण ताकदीने उभी केली. नाटक हळूहळू उलगडण्याचे कौशल्य आयएमएच्या अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता यांच्या नाट्यपूर्ण निवेदनातून दिसून येते. डॉ. नितीन चव्हाण यांचे शीर्षक गीत मनोवेधक ठरले. संगीताला साज दिलाय तोही डॉ. चव्हाण आणि विवेक वाडिये यांनी. ध्वनी संयोजन आशिष घाणेकर, प्रकाशयोजना प्रदीप शिवगण आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केली होती. डॉ. निनाद आणि डॉ. नीलेश नाफडे बंधूंचे मार्गदर्शन या नाटकाला लाभले. डॉ. संजीव पावसकर, डॉ. अनिषा, अश्विन वैद्य, संपदा जोशी यांचे उत्तम सहकार्य नाटकाला मिळाले. या सर्वांच्या परिश्रमाने डॉक्टर मंडळींचा आगळावेगळा नाट्यप्रयोग रसिकांना पहायला मिळाला. (प्रतिनिधी)

Web Title: The eagerness of the audience that 'there is somebody ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.