डस्टबीन अजूनही कचऱ्यात

By Admin | Updated: July 21, 2016 00:56 IST2016-07-20T22:55:49+5:302016-07-21T00:56:59+5:30

रत्नागिरी नगरपरिषद : ५० हजार प्लास्टिक डस्टबीन पडून

The dustbin still in the trash | डस्टबीन अजूनही कचऱ्यात

डस्टबीन अजूनही कचऱ्यात

रत्नागिरी : शहरातील एलइडी प्रकल्पाचा दीड वर्ष सुरू असलेला घोळ नुकताच संपला आहे. एलइडी पथदीप शहरात सुरू झाले आहेत. आता शहरवासीयांना ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी प्लास्टिक डस्टबीन देण्याच्या कार्यक्रमाचा घोळ सुरू आहे. दोन महिन्यांपासून पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर पोत्यांमध्ये भरलेली डस्टबीन वितरण करण्याचा महूर्त कधी निघणार? निवडणुकीच्या धामधुमीत वितरणाचा मुहूर्त आहे काय, असा खोचक सवाल रत्नागिरीकरांमधून विचारला जात आहे.
रत्नागिरीचा घनकचरा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षांत होऊ शकलेला नाही. त्याचे भिजत घोंगडे असताना शहरवासीयांना प्रत्येक कुटुंबामागे कचरा संकलनासाठी दोन डस्टबीन वितरीत करण्याची योजना पालिकेने आखली. त्यासाठी मध्यम आकाराच्या ५० हजार प्लास्टिक डस्टबीन पालिकेत आणल्या गेल्या. या डस्टबीनची पोती पालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आली आहेत. यातील प्रत्येक डस्टबीनवर नंबर टाकला जाणार असल्याचे दोन महिन्यांपूर्वीच कारभाऱ्यांनी सांगितले होते. परंतु आतापर्यंत नंबर टाकण्याचे कामच पूर्ण झालेले नाही. ५० हजारपैकी अवघ्या १२ हजार डस्टबीनवर नंबर टाकण्यात आल्याचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी स्पष्ट केले आहे. १२ हजार डस्टबीनवर नंबर टाकण्यासाठी दोन महिने लागले तर उर्वरित ३८ हजार डस्टबीनवर नंबर टाकण्यासाठी अजून सहा महिने लागणार काय, असा सवालही केला जात आहे.
एलइडी योजनेसाठी प्रथम मागवण्यात आलेल्या निविदा अधिक दराच्या होत्या. त्यावर वादंग झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यात लक्ष घातला व नंतर दोन कोटींचा खर्च ७० लाखांनी कमी झाला. त्यामुळे पालिकेच्या अनेक योजना, प्रकल्पांबाबत संशयाचे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. घनकचरा प्रकल्पाचा पत्ता नाही. प्रत्येक अपार्टमेंटच्या आवारात कचऱ्याचा खतप्रकल्प उभारण्याचाही पत्ता नाही. मात्र, आता ओला व सुका कचरा संकलनासाठी नागरिकांना पालिकेकडून दोन छोट्या डस्टबीन दिल्या जाणार आहेत. या डस्टबीनचे वितरण नंबरमुळे अडले आहे की निवडणुकीमुळे अडले आहे, असा सवाल आता नागरिकांतून केला जात आहे. या डस्टबीन खरेदीसाठी तब्बल २५ लाखांवर रक्कम खर्च करण्यात आली आहे. खर्च करण्यात आलेल्या रकमेच्या तुलनेत या डस्टबीनचा दर्जा आहे की नाही, घाऊक प्रमाणात डस्टबीन खरेदी केलेल्या असल्याने त्यासाठी २५ लाख एवढी रक्कम योग्य आहे की यात काळेबेरे आहे, असा संशयही नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याबाबत पारदर्शकता दाखवत खुलासा होण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)+

रत्नागिरी शहरात दररोज २२ ते २४ टन कचरा संकलित केला जातो. दर महिन्याला ७२ ते ७५ टन कचरा संकलित होतो, तर वर्षभरात ८५० ते ९०० टन कचरा संकलन होते. त्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प नगरपरिषदेकडून सुरू करण्यात आलेला नाही. घनकचरा प्रकल्पाच्या नावाने आश्वासनांची शाळा सुरू असून, प्रकल्पाबाबत पालिका गंभीर का नाही, असा सवाल केला जात आहे.

Web Title: The dustbin still in the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.