वीकेंडमध्ये गणपतीपुळे गजबजले; ५२ हजार भाविक 'श्री' च्या दर्शनाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:09 IST2025-12-15T17:09:29+5:302025-12-15T17:09:57+5:30
समुद्रकिनाऱ्यारील ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती

वीकेंडमध्ये गणपतीपुळे गजबजले; ५२ हजार भाविक 'श्री' च्या दर्शनाला
रत्नागिरी : हिवाळी पर्यटन, शाळांमधून येणाऱ्या सहली, त्याचबराेबर वीकेंडला पर्यटनासाठी बाहेर पडणारी मंडळी यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गजबजून गेली आहेत. जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांबराेबरच तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळेला सर्वाधिक पसंती मिळत आहे. शनिवार, रविवार या दाेन दिवसांत तब्बल ५२ हजार भाविकांनी गणपतीपुळेतील ‘श्रीं’चे दर्शन घेतले.
हिवाळा हा पर्यटनासाठी उत्तम मानला जात असल्यामुळे पर्यटकांची पावले जिल्ह्याकडे वळू लागली आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, विविध ग्रुप, त्याचबराेबर शाळा-महाविद्यालयीन सहली जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ गजबजून गेली आहेत. जिल्ह्यात येणारे पर्यटक दोन ते तीन व त्यापेक्षा अधिक दिवस मुक्काम करत आहेत. जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यारील ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती आहे.
रत्नागिरीत दाखल होणारे पर्यटक गणपतीपुळेसह आरेवारे, रत्नागिरी, पावस, गणेशगुळे, पूर्णगड, आडिवरे, कशेळी, जयगड येथेही भेटी देत आहेत. काही पर्यटक जयगडहून गुहागर गाठत आहेत, तर काही पर्यटक पूर्णगड मार्गे सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूरकडे जात आहेत.
गणपतीपुळे येथे गेल्या दोन दिवसांत पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शनिवारी ३० हजार, तर रविवारी २२ हजार मिळून दोन दिवसांत तब्बल ५२ हजार पर्यटकांनी स्वयंभू गणेशाचे दर्शन घेतल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले. ‘श्रीं’चे दर्शन घेतल्यानंतर बहुतांशी पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेत आहेत. त्यामुळे समुद्रकिनाराही पर्यटकांनी फुलून जात आहे.
गणपतीपुळेबराेबरच, मालगुंड, वरवडे, काजिरभाटी, आरेवारे येथील समुद्रकिनाऱ्यांवरही पर्यटकांची गर्दी हाेत आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांकडून काेकणी खाद्यपदार्थांना विशेष मागणी हाेत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
दापोली, गुहागर येथेही पर्यटकांची गर्दी
दापोलीतील हर्णै, आंजर्ले, मुरूड, पाळंद, कर्दे याठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्याचबराेबर गुहागर येथील हेदवी, गुहागर समुद्रकिनारा, वेळणेश्वर, असगोली, वेलदूर-नवानगर, धोपावे येथेही पर्यटक भेटी देत आहेत. अलीकडेच प्रकाशझाेतात आलेल्या कशेळी (ता. राजापूर) येथील ‘देवघळी’ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी हाेत आहे.
चाैपदरीकरणामुळे रखडपट्टी
सध्या आंबा घाटात चाैपदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच जिल्ह्यातही काही ठिकाणी महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्यांच्या कामामुळे पर्यटकांना विलंब होत आहे. शिवाय धुळीचा त्रासही सहन करावा लागत आहे.
वाॅटर स्पोर्ट्ससाठी पसंती
पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याचे आकर्षण अधिक असल्यामुळे किनाऱ्यावरील वाॅटरस्पोर्ट्सला अधिक पसंती मिळत आहे. याशिवाय उंट, घोडागाडी, बैलगाडी सवारी, झिपलाइन, पॅरासेलिंग याचाही आनंद पर्यटक लुटत आहेत.