डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकर व्हावे, राष्ट्रपतींनी व्यक्त केली अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:47 IST2022-07-11T18:46:59+5:302022-07-11T18:47:56+5:30
राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष भिकूजी तथा दादा इदाते यांनी राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकर व्हावे, राष्ट्रपतींनी व्यक्त केली अपेक्षा
चिपळूण : मंडणगड तालुक्यातील आबंवडे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आदर्श सांसद ग्रामच्या माध्यमातून विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येत असून, हे स्मारक लवकरच व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष भिकूजी तथा दादा इदाते यांनी राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात घडलेल्या विविध घटनांवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी दादा इदाते राष्ट्रपती भवनात गेले. यावेळी त्यांचे नातू अथर्व इदाते व स्वीय सहायक अजित आंब्रे उपस्थित होते. दादा इदाते यांनी राष्ट्रपती कोविंद यांना भारतमातेची प्रतिमा भेट देत शुभेच्छा दिल्या.
दादा इदाते यांनी सुमारे एक तासभर चर्चा केली. या भेटीत वैयक्तिक बाबी आणि राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीबद्दल चर्चा झाल्या. यावेळी राष्ट्रपतींनी काही सूचनाही दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलोपार्जित गावाचा उल्लेख करताना राष्ट्रपतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या आराखड्याची माहिती घेतली व माजी खासदार अमर साबळे यांनी ते गाव दत्तक घेतले होते व हे स्मारक लवकरच व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.