आबलोली : उन्हाळी सुटीबाबत अजूनही काही सूचना आलेल्या नसल्या तरी, सुटीमध्ये स्वगावी जाणाऱ्या शिक्षकांची आताच कोरोना ड्युटी पूर्ण करून घ्यावी. शक्यतो उन्हाळी सुटीमध्ये स्थानिक शिक्षकांना ड्युटी काढली जावी, अशा प्रकारची विनंती शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आली. गुहागर पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर यांनी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींची बैठक गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे, विस्तार अधिकारी लीना भागवत, अस्मा पटेल, तसेच सर्व केंद्रप्रमुख यांच्यासमवेत आयोजित केली होती. या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
दैनंदिन कामकाज करताना शिक्षकांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी तसेच गुहागर तालुक्याच्या गुणवत्ता विकासासाठी कृती कार्यक्रम निश्चित करणे याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग कापले, सदस्य रवींद्र आंबेकर, आबलोली गावचे माजी सरपंच नरेश निमुणकर उपस्थित होते.
तालुक्याच्या गुणवत्ता विकासासाठी विशेषतः पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्यासंदर्भाने अगदी पहिलीपासून तयारीसाठी नियोजन करणे, शिक्षकांसाठी भविष्यात कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर एखाद्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करणे, शिक्षकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करणे, यासाठी सभापतींच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी व संघटनेचे अध्यक्ष यांची एक समिती निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले. या समितीच्याअंतर्गत विविध उपक्रमांसाठी तज्ज्ञ शिक्षकांच्या सहभागाने विविध समित्या निर्माण करून त्याद्वारे उपक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
शिक्षकांकडून शालेय माहिती मागविताना घाई केली जाणार नाही. माहिती देण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. आरोग्य केंद्रावरील काम करताना रमजान काळात उर्दू शिक्षकांना नेमणुका दिल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, असेही सांगण्यात आले. शिक्षकांचे प्राॅव्हिडंट फंड हिशेब व त्यामध्ये असलेल्या काही चुका यांच्या दुरुस्तीबाबत तसेच प्राॅव्हिडंट फंड रकमेबाबत जिल्हास्तरावर शिक्षकांनी दिलेले प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करणेसंदर्भाने जिल्हास्तरावर चौकशी करण्याचे आश्वासन सभापतींनी दिले.
मागील वर्षांपर्यंत अप्राप्त सर्व शिष्यवृत्त्यांची रक्कम लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सभापती पूर्वी निमुणकर यांनी दिले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी, शिष्यवृत्ती परीक्षेबाबत नियोजन करून कार्यवाही केली, तर भविष्यात उत्तम निकाल आपणास मिळेल, असे सांगितले.
तालुक्यातील सर्व शिक्षकांनी या गुणवत्ता विकासासाठी जबाबदारीने अत्यंत मेहनत घेऊन तालुक्याचा स्पर्धा परीक्षांतील टक्का वाढविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन यावेळी सभापती पूर्वी निमुणकर यांनी केले.