रत्नागिरीतील नाट्यगृहाचं चित्रपटगृह करू नका, नाट्यप्रेमींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:08 IST2025-12-11T18:08:29+5:302025-12-11T18:08:42+5:30
नाट्यगृहात चुकीचा पायंडा पडायला नको

रत्नागिरीतील नाट्यगृहाचं चित्रपटगृह करू नका, नाट्यप्रेमींचा इशारा
रत्नागिरी : शहरात नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात शनिवारी व रविवारी एका चित्रपटाचे शाे लावण्यात आले आहेत. मात्र, या प्रकारामुळे शहरातील नाट्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, या प्रकाराला तीव्र शब्दात विराेध केला आहे. रत्नागिरीतील देखण्या नाट्यगृहाच चित्रपटगृह करू नका, असा इशाराच नाट्यप्रेमींनी दिला आहे.
रत्नागिरीतील नाट्यगृहाचे नूतनीकरण केल्यानंतर या नाट्यगृहाची गणना राज्यातील उत्तम नाट्यगृहांमध्ये करण्यात येत आहे. नाट्यगृहाच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना विविध नाटके पाहण्याची संधी मिळाली. अलीकडेच राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांचे सादरीकरणही याठिकाणी करण्यात आले. त्यालाही नाट्यरसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र, याच नाट्यगृहात एका संस्थेने शनिवार आणि रविवार असे चित्रपटाचे शाे आयाेजित केले आहेत.
हा प्रकार शहरातील नाट्यप्रेमींच्या लक्षात येताच त्यांनी या शाेंना विराेध केला आहे. नाट्यगृहात चित्रपट दाखवले गेले तर सिनेमागृह कशासाठी? नाटकांऐवजी चित्रपटच दाखवले जातील, असेही नाट्यप्रेमींचे म्हणणे आहे. नाट्यगृह हे नाटकांसाठी असावे, अशी मागणीही नाट्यप्रेमींनी केली आहे.
नाट्यगृहात चुकीचा पायंडा पडायला नको
शहरातील नाट्यगृह हे नाटकांसाठी असले पाहिजे. त्याठिकाणी सिनेमा दाखवणे हे अत्यंत चुकीचे आहे. एका संस्थेला ही संधी दिल्यास अन्य संस्थाही यासाठी मागणी करतील. त्यामुळे चुकीचा पायंडा पडायला नकाे, असे एका जाणकार नाट्यप्रेमीने नाव न छापण्याच्या अटीवर बाेलताना सांगितले.
अन्यत्र कोठेही घ्या
सिंधुदुर्गात या चित्रपटाचे शाळा, महाविद्यालयांमध्ये शाे दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतही शाळा, महाविद्यालय किंवा एखाद्या मैदानावर शाेचे आयाेजन करावे. शहरातील बंद सिनेमागृहाचाही वापर करता येऊ शकताे, केवळ नाट्यगृहासाठी अट्टाहास का? असा प्रश्नही नाट्यप्रेमींकडून केला जात आहे.