Ratnagiri: हर्णै समुद्रकिनारी आढळला मृतावस्थेत डॉल्फिन, नमुने प्रयोगशाळेत पाठविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:56 IST2025-09-08T16:55:48+5:302025-09-08T16:56:35+5:30
गंभीर दुखापतीमुळे त्याला वाचविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले

Ratnagiri: हर्णै समुद्रकिनारी आढळला मृतावस्थेत डॉल्फिन, नमुने प्रयोगशाळेत पाठविणार
दापोली (जि.रत्नागिरी) : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी रविवारी सकाळी एक डॉल्फिन मृतावस्थेत सापडला. गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या या डॉल्फिनला वाचविण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्याला वाचविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.
हा डाॅल्फिन गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी मच्छीमारांनी अथक प्रयत्न केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच डाॅल्फिन पाहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली हाेती. हर्णै समुद्रकिनाऱ्यावर यापूर्वीही डॉल्फिन मृतावस्थेत सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने समुद्री जीवांचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.
मच्छीमारांच्या मते, खोल समुद्रात होणारी मासेमारी, बोटींची वाढती संख्या, तसेच काही ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या जाळ्यांमुळे समुद्री जिवांना धोका निर्माण होत आहे. या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी मत्स्य विभागाने तसेच पर्यावरण विभागाने एकत्रितपणे उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
नमुने प्रयाेगशाळेत पाठविणार
या घटनेची माहिती स्थानिकांनी मत्स्य विभागाला दिली. त्यानंतर मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल हाेत पाहणी केली. डॉल्फिनच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी काही नमुने गोळा करण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.