रत्नागिरीत २२ नोव्हेंबरला रंगणार जिल्हा साहित्य संमेलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:54 IST2025-10-27T18:54:07+5:302025-10-27T18:54:41+5:30
संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस भूषविणार

रत्नागिरीत २२ नोव्हेंबरला रंगणार जिल्हा साहित्य संमेलन
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था व मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे आयाेजन करण्यात आले आहे. चरित्रकार धनंजय कीर साहित्य नगरीमध्ये शनिवार, दि. २२ नोव्हेंबरला हे संमेलन हाेणार आहे, अशी माहिती नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन व संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस भूषविणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनासाठी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, युवा कवी अनंत राऊत, युवा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप मुणगेकर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाची सुरुवात सकाळी सहा वाजता खल्वायन संस्थेच्या उषःकाल काव्य मैफिलीने हाेणार आहे. त्यानंतर रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर बदीउज्जमा खावर सभागृह, माधव कोंडविलकर ग्रंथप्रदर्शन आणि चरित्रकार धनंजय कीर साहित्य नगरी या व्यासपीठाचे उद्घाटन होणार आहे. कोकणचा साज, संगमेश्वरी बाज या सांस्कृतिक कार्यक्रमाने साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.