जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडे २० पर्यंत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By शोभना कांबळे | Published: May 16, 2024 05:45 PM2024-05-16T17:45:19+5:302024-05-16T17:45:49+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सूनपूर्व तयारीसाठी गुरूवारी आढावा बैठक घेण्यात आली.

District Collector orders to submit District Disaster Management Plan by 20 | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडे २० पर्यंत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडे २० पर्यंत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी : पाटबंधारे विभागाने नदीपात्रातील गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे. जुन्या इमारती, पूल, शाळा यांचे संबंधित विभागांनी स्ट्रक्चरल ऑडीट करावे. सर्वच विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे २० मे पर्यंत पाठवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सूनपूर्व तयारीसाठी गुरूवारी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्राकांत सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरण करुन गेल्या वर्षी झालेला सरासरी पाऊस, २०११ ते २०२३ या कालावधित झालेला सरासरी पाऊस, आपत्तींचा पूर्वानुभव, पूर प्रवण, दरड प्रवण गावे, रासायनिक कारखाने, धोकादायक कारखाने आदींबाबत सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी  सिंह यांनी विभागनिहाय सविस्तर पूर्व तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली सुरु असल्याबाबत गटविकास अधिकारी नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी तपासून खात्री करावी. प्रत्येक तहसीलदारांकडे सॅटेलाईट फोनचे वितरण करा. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची तयारी ठेवावी. तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्याकडील असणारी साधनसामुग्री सुस्थितीत आहे का याची तपासून खात्री करावी.

पाटबंधारे विभागाने नद्यांमधील विशेषत: शहरालगतच्या भागातील गाळ काढण्याचे काम अधिक सक्रीय आणि प्राधान्याने  करावे. धोकादायक ठिकाणी इशारे देणारे फलक उभारावेत. नियंत्रण कक्षाची स्थापना करुन, जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्कात रहावे. आय एम डी कडून पावसाचा इशारा मिळताच, आरोग्य विभागाने आपल्या रुग्णवाहिका त्या-त्या तालुक्यात तयार ठेवाव्यात. आवश्यक ती सर्व पूर्वतयारी ठेवावी. नगरपरिषदांनी आपल्या हद्दीतील जुन्या इमारतींचे ऑडीट करावे. पूर नियंत्रण आराखड्याबरोबरच स्थलांतराचा आराखडाही तयार ठेवावा.

महावितरणने जीर्ण पोल बदलावे, धोकादायक झाडांच्या फांद्या तोडणे जलद कृती पथक तयार करणे आदी कामे करावीत. लोटे एम आय डी सी असोसिएशमची बैठक घेऊन सतर्क करावे. शिक्षण विभागाने धोकादायक शाळा, छत दुरुस्ती आदी बाबतची कामे करावीत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर बैठक घेवून सुक्ष्म नियोजन करावे. पडलेली झाडे हटवण्यासाठी कटर सारखी साधन सामुग्री व्यवस्थित ठेवावी, अशा सुचना केल्या. या बैठकीला विविध विभागांचे प्रमुख, प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

१५.२० लक्ष घनमीटर गाळ उपसा
चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतून १० लाख ४९ हजार घनमीटर व नाम फौंडेशनमार्फत शिव नदीतून  ४ लाख २ हजार २२२ घनमीटर असा एकूण १५.२० लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी आपल्या सादरीकरणात दिली.

Web Title: District Collector orders to submit District Disaster Management Plan by 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.