रत्नागिरी: असेसमेंटवर नाव बदलण्यासाठी लाचेची मागणी, परुळेच्या ग्रामसेवकास रंगेहात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 18:08 IST2022-07-27T18:08:35+5:302022-07-27T18:08:57+5:30
या कारवाईनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली.

रत्नागिरी: असेसमेंटवर नाव बदलण्यासाठी लाचेची मागणी, परुळेच्या ग्रामसेवकास रंगेहात अटक
राजापूर : राहत्या घराच्या असेसमेंटवरील आजोबांचे नाव बदलून वडीलांचे नाव घालण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच स्वीकारणाऱ्या परुळे गावच्या ग्रामसेवकास रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. संजय बबन दळवी (वय-४१) असे या जेरबंद केलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली.
तक्रारदार हे राजापूर तालुक्यातील परुळे गावचे रहिवाशी आहेत. त्यांच्या राहत्या घराचा असेसमेंट उतारा आजोबांच्या नावावर होता. तो वडीलांच्या नावावर करायचा होता. याकामासाठी ग्रामसेवक दळवी याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याबाबत रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीवरुन लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. दरम्यान तक्रारदार यांच्या पाचल बाजारपेठेतील कार्यालयात ग्रामसेवक दळवी याने लाचेची रक्कम स्वीकारली अन् घरी गेले. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दळवी याच्या घरी जावून पंचासमक्ष रंगेहात पकडले.