दापोली : रायगड जिल्हा पालकमंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल. पालकमंत्रिपदाचा लवकरच निर्णय लागेल, असे फलोत्पादन, रोजगार हमी व खार जमीन विकासमंत्री भरत गाेगावले यांनी मुरुड (ता. दापाेली) येथे बाेलताना सांगितले. खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री घेतील ताे निर्णय मान्य असेल असे जाहीर केल्यानंतर मंत्री गाेगावले यांनीही मवाळ भूमिका घेतली आहे.मंत्री भरत गाेगावले साेमवारी मुरुड येथे एका समारंभासाठी आले हाेते. रायगडच्या पालकमंत्रिबाबत त्यांनी दाेन दिवसांचा अल्टिमेटम दिला हाेता. ही मुदत संपल्याने पत्रकारांनी त्यांना याबाबत छेडले असता ते म्हणाले की, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत गेल्याने या चर्चेला उशीर झाला आहे. त्यामुळे निर्णय झालेला नाही, असे मंत्री गाेगावले म्हणाले.रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदेसेनेत नाराजी नाट्य सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री जाे निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असे वक्तव्य केले हाेते. आता मंत्री भरत गोगावले यांनीही वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी सावध भूमिका घेतली आहे.दाेन्ही शिवसेना एकत्र येतील हे संजय शिरसाट यांचे वक्तव्य वैयक्तिक हाेते, असेही मंत्री गाेगावले म्हणाले. पक्षाची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असून, ते जो निर्णय घेतील ते मान्य असेल, असेही मंत्री गाेगावले यांनी स्पष्ट केले.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय लवकरच लागेल : भरत गोगावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:16 IST