अस्तान कातकरीवाडी येथे शाळकरी मुलींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 20:19 IST2020-11-27T20:17:44+5:302020-11-27T20:19:40+5:30
खेड तालुक्यातील अस्तान कातकरीवाडी येथे दोन शाळकरी मुली बुधवार २५ रोजी सायंकाळी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. दोघींनी मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी गोळ्या प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अस्तान कातकरीवाडी येथे शाळकरी मुलींचा मृत्यू
खेड : तालुक्यातील अस्तान कातकरीवाडी येथे दोन शाळकरी मुली बुधवार २५ रोजी सायंकाळी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. दोघींनी मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी गोळ्या प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तालुक्यातील अस्तान कातकरीवाडीत राहणाऱ्या भारती हिलम (१५) व साक्षी निकम (१३) या दहावी व नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींचा बुधवारी मृत्यू झाला. भारती हिलम ही साक्षी निकम हिच्याकडे पाहुणी म्हणून आली होती. तिचे वडील किसन हिलम हे शिक्षक- पालक संघाच्या बैठकीसाठी आंबवली हायस्कूलमध्ये गेले होते.
बैठकीनंतर ते घरी गेले असता त्यांना दोन्ही मुली घरातच पडलेल्या आढळल्या. दोघींना तातडीने आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
दोघीचे शव विच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या दोघींच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात पोलिस यंत्रणा गुंतली आहे याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद सायंकाळी उशिरा करण्यात आली.