‘बिपरजाॅय’चा गणपतीपुळे किनारपट्टीला तडाखा; अजस्त्र लाटामुळे दुकाने भुईसपाट, पर्यटक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 12:22 PM2023-06-12T12:22:03+5:302023-06-12T12:25:58+5:30

सुमारे १० ते १२ फूट उंच उडणाऱ्या या लाटांमुळे किनाऱ्यावरील सर्व दुकाने भुईसपाट

Damage on Ganpatipule coast due to Cyclone Biporjoy | ‘बिपरजाॅय’चा गणपतीपुळे किनारपट्टीला तडाखा; अजस्त्र लाटामुळे दुकाने भुईसपाट, पर्यटक जखमी

‘बिपरजाॅय’चा गणपतीपुळे किनारपट्टीला तडाखा; अजस्त्र लाटामुळे दुकाने भुईसपाट, पर्यटक जखमी

googlenewsNext

गणपतीपुळे : बिपरजाॅय चक्रीवादळाचा प्रभाव किनारपट्टी भागात कायम आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे सलग तीन दिवस लाटांचे तांडव सुरू असून, रविवारी (दि. ११ जून) सायंकाळी ५:३० वाजण्याच्या दरम्यान अजस्त्र लाटा किनाऱ्यावर धडकल्या. सुमारे १० ते १२ फूट उंच उडणाऱ्या या लाटांमुळे किनाऱ्यावरील सर्व दुकाने भुईसपाट झाली. तर लाटेबराेबर १० ते १५ पर्यटक किनाऱ्यावरील धक्क्यावर आपटून जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.

शाळा, महाविद्यालये चालू आठवड्यात सुरू हाेत असल्याने उन्हाळी सुटीचा शेवटचा रविवार असल्याने गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी झाली हाेती. दिवसभरात सुमारे २० हजार पर्यटक गणपतीपुळे येथे येऊन गेल्याची नाेंद ‘श्रीं’च्या मंदिरात झाली आहे. सायंकाळी ओहाेटीमुळे पर्यटक बिनधास्त हाेते; मात्र सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमाराला समुद्राने राैद्ररूप धारण केले आणि अजस्त्र लाटा उसळल्या.

अचानक समुद्राचे पाणी वाढल्याने पर्यटकांची धावाधाव सुरू झाली. गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीवरून गणपतीपुळे मोरया चौक ते रेस्ट हाऊस रस्त्यावर जोराने लाटा आदळत हाेत्या. अजस्त्र लाटेने अनेक महिला पर्यटकांच्या पर्स वाहून गेल्या, तर अनेकांचे मोबाइलही पाण्याने गिळंकृत केले.

या लाटेच्या तडाख्याने जखमी झालेल्या पर्यटकांना औषधोपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक जयदीप खळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळवी, पोलिस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण, तसेच रत्नागिरी येथून बंदोबस्तासाठी आलेल्या पाेलिसांनी किनाऱ्यावर धाव घेतली. त्यांनी सर्व पर्यटकांना समुद्राच्या बाहेर काढले. पोलिसांसाेबत गणपतीपुळे ग्रामपंचायत, सुरक्षारक्षक, श्रीदेव गणपतीपुळे संस्थानचे सुरक्षारक्षक व ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

व्यापाऱ्यांची सतर्कता

दाेन दिवसांपूर्वी माेठ्या लाटेने काही व्यावसायिकांचे नुकसान झाले हाेते. त्यामुळे किनाऱ्यावर सुमारे १५ स्टाॅलधारकांनी आपले स्टाॅल सुरक्षित ठिकाणी उभारले हाेते. त्यामुळे त्यांना फटका बसला नाही. मात्र, १० स्टाॅलधारकांचे स्टाॅल समुद्राच्या लाटेत भुईसपाट झाले.

मुलगा बालंबाल बचावला

समुद्राची लाट ज्या वेगाने येत हाेती, त्याच वेगाने परत जात हाेती. ही लाट परतत असताना एक मुलगा पाण्याबराेबर ओढला गेला. मात्र, जीवरक्षक व पर्यटकांनी त्याला पकडल्याने ताे बचावला. त्यानंतर ताे मुलगा खूप घाबरला हाेता.

Web Title: Damage on Ganpatipule coast due to Cyclone Biporjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.