चक्रीवादळाचा कोकण रेल्वेला फटका, ट्रॅकवर झाड कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 13:22 IST2021-05-16T13:21:09+5:302021-05-16T13:22:07+5:30
नेत्रावती एक्स्प्रेस मडगाववरून थिवीमकडे जात असता ट्रॅकवर झाड कोसळले, वाहतूक ठप्प

चक्रीवादळाचा कोकण रेल्वेला फटका, ट्रॅकवर झाड कोसळले
रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. आता या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळात होतं आहे. याचा फटका गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. शनिवारी कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसानं कहर केला आहे. अरबी समुद्रातील वादळामुळे किनारपट्टीवर येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यानं कोकणातील एका रेल्वे ट्रॅकवर झाड कोसळलं आहे. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.
रविवारी सकाळी नेत्रावती एक्स्प्रेस ट्रेन मडगाववरून थिवीमकडे जात असता ट्रेनवर झाड कोसळल्याने मध्येच ही ट्रेन थांबवावी लागली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. सध्या लोहमार्गावर पडलेल्या या झाडाला हटवण्याच काम युद्धपातळीवर सुरू असून रेल्वेसेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.