लावणी, कोळीनृत्य, ठाकरीनृत्य, दिंडी-वारकरी नृत्यांतून महाराष्ट्राची संस्कृती

By शोभना कांबळे | Published: February 14, 2024 03:34 PM2024-02-14T15:34:20+5:302024-02-14T15:34:50+5:30

महासंस्कृती महोत्सवाची रत्नागिरीकरांवर तिसऱ्या दिवशीही मोहिनी

Culture of Maharashtra through Lavani, Koli dance, Thakari dance, Dindi-Varkari dances from Mahasanskrit Mahotsav in Ratnagiri | लावणी, कोळीनृत्य, ठाकरीनृत्य, दिंडी-वारकरी नृत्यांतून महाराष्ट्राची संस्कृती

लावणी, कोळीनृत्य, ठाकरीनृत्य, दिंडी-वारकरी नृत्यांतून महाराष्ट्राची संस्कृती

रत्नागिरी : शाहीर नंदेश उमप यांच्या महाराष्ट्राची संस्कृती या कार्यक्रमातील गण,गवळण, लोकगीते, भारुड, लावणी, कोळी नृत्य, ठाकरी नृत्य, दिंडी-वारकरी नृत्यांनी समस्त रसिकांना ठेका धरायला लावला. महासंस्कृती महोत्सवाची रत्नागिरीकरांवर तिसऱ्या दिवशीही मोहिनी कायम होती.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात शाहीर नंदेश उमप प्रस्तुत ‘महाराष्ट्राची संस्कृती’हा कार्यक्रम मंगळवारी झाला. तत्पूर्वी कोकण नमन कला मंचाच्यावतीने भजनाचा कार्यक्रम झाला. प्रारंभी शाहीर नंदेश उमप, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, उपायुक्त राजकुमार कोले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पत्रकार अलिमियाँ काझी, किशोर मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. त्यानंतर शाहीर उमप यांचे स्वागत करण्यात आले.

उमप यांच्या भारदस्त पहाडी आवाजातील नमनाने सुरूवात झाली. गण -गवळण,बहिणाबाईंच्या ओव्या, ग्रामसंस्कृती जागवणारी लोकगीते, दिंडी –वारकरी गीताने अख्या रसिकांना डोलायला लावलं. शाहीर उमप थेट रसिकांमध्ये उतरले. उपस्थितांमधून विठ्ठल नामाचा गजर आणि त्याच्या जोडीला टाळ्या यांनी वातावरण भारुन गेले होते. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो’, ‘लिंगोबाचा डोंगूर आभाळीगेला’ या ठाकर गीतांवरील नृत्यांने आणि यानंतर तमाम महाराष्ट्राच्या लाडक्या लावणीने रसिकांना अक्षरश: वेड लावले.

शिट्या-टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पहायला मिळाला. ढोलकीवरील थाप, ताल आणि त्याच्या जोडीला उपस्थितीत प्रेक्षकांकडून मिळाणाच्या टाळ्यांची लयबद्धता यांच्या जुगलबंदीने बराच वेळ रंगत आणली. गीत, संगीत, नृत्य, गायन, वादन, सोंगी भजन, भारुड आदी कलाविष्कारांनी उपस्थितांना दंगवून टाकले.

जाती -धर्माचं सोवळं जाळलं तरच स्वराज्य उजळेल..

छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय महाराष्ट्र काय, देशही पूर्ण होऊ शकत नाही. अशा राजांच्या जीवनातील शिवप्रताप दिन पोवाड्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साकारलेल्या पात्राने स्वराज्याच्या उभारणीत अठरापगड जाती, रोहिले, मुस्लीम मावळ्यांचा सहभाग घेतल्याचा आवर्जून उल्लेख केला. शिवाय आजही तंतोतंत लागू पडणारा ‘जाती-धर्माचं सोवळं आपण जाळलं, तरच स्वराज्य उजळेल’ हा मौलिक संदेशही या कार्यक्रमातून दिला.

७३ वर्षीय तरूणाचा उत्साह..

शाहीर उमप यांच्या भारदस्त पहाडी आवाजाने ‘पयलं नमन.. ’ ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर गण आणि त्यानंतर झालेल्या ‘कान्हा वाजवी बासरी’ या गवळणने रसिकांची पाऊले थेट मंचावरच थिरकायला सुरुवात झाली. बालकांसोबत ७३ वर्षीय वृदधाच्या नृत्याने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.

Web Title: Culture of Maharashtra through Lavani, Koli dance, Thakari dance, Dindi-Varkari dances from Mahasanskrit Mahotsav in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.