दापोली : तालुक्यातील टेटवली येथे चक्क गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. दापाेली पाेलिसांनी टाकलेल्या छाप्यात ही लागवड उघड केली असून, या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दापोली तालुक्यातील टेटवली येथील सरोदेवाडी येथे गुरुवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास दापोली पोलिसांनी छापा मारला. त्यावेळी त्यांना सीताबाई रामचंद्र इदाते यांच्या घराच्या मागील बाजूला कुडाच्या कुंपणामध्ये गांजा सदृश्य रोपांची झाडे आढळली. दापोली पोलिसांनी ही ११ रोपे जप्त करून त्याचे वजन केले असता ते १ किलो ३४३ ग्रॅम इतके भरले. त्याची किंमत ३ हजार ५५० रुपये इतकी आहे. महिला पोलिस कॉन्स्टेबल सोनाली गावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित सीताबाई इदाते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलिस करत आहेत.
घराच्या मागे केली गांजाच्या रोपांची लागवड, दापोलीत एका महिलेवर गुन्हा दाखल
By मनोज मुळ्ये | Updated: June 17, 2023 13:54 IST