CoronaVirus Lockdown : संभ्रमावस्थेत परप्रांतीय, जीवाच्या भीतीने परतायचे की पोटाच्या आगीसाठी थांबायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:40 IST2020-05-15T18:38:43+5:302020-05-15T18:40:41+5:30
दीड महिना घरात बसून राहिलेल्या मजूर, कामगारवर्गाचा संयम आता सुटू लागला असल्याने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ते अधीर झाले आहेत. मात्र त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे रोजी संपल्यानंतर काही कामे तसेच उद्योग सुरू होतील, अशी आशा वाटत असल्याने आता गावाला जावं की थांबावं, अशा संभ्रमावस्थेत काही परप्रांतीय मजूर, कामगार सापडले आहेत.

CoronaVirus Lockdown : संभ्रमावस्थेत परप्रांतीय, जीवाच्या भीतीने परतायचे की पोटाच्या आगीसाठी थांबायचे
रत्नागिरी : दीड महिना घरात बसून राहिलेल्या मजूर, कामगारवर्गाचा संयम आता सुटू लागला असल्याने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ते अधीर झाले आहेत. मात्र त्याचवेळी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे रोजी संपल्यानंतर काही कामे तसेच उद्योग सुरू होतील, अशी आशा वाटत असल्याने आता गावाला जावं की थांबावं, अशा संभ्रमावस्थेत काही परप्रांतीय मजूर, कामगार सापडले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव थोपवण्याच्या दृष्टीने २३ मार्चपासून देशभर लॉकडाऊन सुरू झाले आहे. सुरूवातीला हे लॉकडाऊन ३१ मार्चपर्यंत जाहीर करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊनची मुदत दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली.
या कालावधीत सर्वच छोटे मोठे व्यवसाय - उद्योग आणि बांधकाम, रस्ते आदी कामे थांबल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना घरी बसण्याची वेळ आली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, अशा मजुरांचीही काम नसल्याने आता मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे.
परजिल्ह्यातील, परराज्यातील मजुरांना याचा फटका जास्त बसला. कुटुंब सोबत असल्याने बहुतांश मजूर भाड्याच्या खोलीत राहात आहेत. त्यामुळे काम बंद असले तरी खोलीचे भाडे आणि दर दिवसाचा खाण्या-पिण्याचा खर्च तर करावाच लागत आहे. त्यामुळे काहींची उपासमार होत आहे.
जिल्ह्यात सुमारे १५ ते २० हजार कामगार, मजूर वास्तव्याला आहेत. जिल्हा प्रशासनाकडून तसेच सामाजिक संस्थांकडून त्यांना काहीअंशी मदतीचा हात दिला जात असला तरी इतर जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळेनाशा झाल्या आहेत. मुलाबाळांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मूळ गावाचे वेध लागले आहेत.
१४ एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढल्यानंतर मात्र या कामगारांचा संयम सुटू लागला. काही जण आपल्या मूळ गावी पायी जाऊ लागले. त्यातच राज्य सरकारने या कामगारांना त्यांच्या गावात जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे संकेत दिल्याने या कामगारांच्या आशा पालवल्या आहेत.
३ मेनंतर काही प्रमाणात शिथिलता आली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने इतर जिल्ह्यात तसेच राज्यातील मजुरांना पाठविण्याची व्यवस्था केल्याने अनेक कामगार परतले आहेत. परंतु काही ठिकाणी बांधकामे सुरू झाली असून, १७ मेनंतर इतरही उद्योग सुरू होतील, अशी आशा काही कामगारांना वाटत आहे. त्यामुळे गावाला जावे की इथच राहावे, अशा द्विधा अवस्थेत अडकले आहेत. काहींनी तर गावाला जाण्याचा विचार बदलला आहे.