corona virus : कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑफलाईन, भरती प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:48 IST2020-08-03T17:47:01+5:302020-08-03T17:48:08+5:30
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरु झाली असून, सुमारे ९०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी होणार आहेत़ कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आॅफलाईन करण्यात येणार आहेत़

corona virus : कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑफलाईन, भरती प्रक्रिया सुरू
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्याबदलीची प्रक्रिया सुरु झाली असून, सुमारे ९०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी होणार आहेत़ कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आॅफलाईन करण्यात येणार आहेत़
सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन, तर आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ जिल्हांतर्गत ऑफलाईन बदली प्रक्रियेमुळे शिक्षकांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ या बदल्या करताना ३० सप्टेंबरपर्यंत रिक्त असलेल्या पदांचा विचार करूनच आंतरजिल्हा बदल्या करण्यात याव्यात, असे शासनाचे आदेश आहेत़
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत़, असे शासनाने जाहीर केले होते़ त्यानंतर ३० जुलैपर्यंत बदल्या करण्यात याव्यात, असे आदेश शासनाने दिले होते़ त्यामध्ये बदल करुन आता या बदल्या करण्यासाठी १० ऑगस्टपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने तयारी केली आहे.
मागील वर्षी बदल्यांमध्ये सुगम आणि दुर्गम क्षेत्रावरून वाद निर्माण झाला होता़ त्यामुळे गटबाजी निर्माण झाली होती. या बदल्यांच्या वेळी काही शिक्षक न्यायालयातही गेले होते. अखेर वादामध्ये सुमारे ३,५०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन करण्यात येणार आहेत़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात एकूण २,५७४ प्राथमिक शाळा आहेत़ त्यामध्ये सुमारे ६ हजार शिक्षक कार्यरत आहेत.
शासनाच्या आदेशानुसार एकूण संख्येच्या १५ टक्के बदल्या करण्यात येणार आहेत़ म्हणजेच जिल्ह्यातील ९०० शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. या बदल्यांसह जिल्ह्यातील ३ केंद्रप्रमुख आणि २ विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. बुधवारी या बदल्या करण्यात येणार आहेत.
शासनाच्या भूमिकेबद्दल आश्चर्य
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा सुरु कराण्यात आलेल्या नाहीत़ त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे ऑनलाईन देण्यात येत आहेत़ मात्र, शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन करण्यात येणार आहेत़, त्याबद्दल शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ तसेच या ऑफलाईन बदल्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे़