बाधित गावांना भेट
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ज्या गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, त्या गावांना पंचायत समिती सभापती जयाशेठ माने यांनी भेट देऊन आढावा घेतला. कोंडिवरे व कडवई गावात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडले आहेत. स्थानिक आरोग्य विभागाला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी तहसीलदार सुहास थोरात, जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड, विभागप्रमुख मनोज शिंदे उपस्थित होते.
कोविड सेंटर सुरू करा
राजापूर : तालुक्यामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. रायपाटण येथे उभारण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची सूचना आमदार साळवी यांनी यावेळी केली. यावेळी लसीकरणाबाबतही आढावा घेण्यात आला.
राष्ट्रीय लोकअदालत स्थगित
रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधी प्राधिकरणातर्फे दि.१० एप्रिल रोजी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे राज्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले असल्याने दि. १० एप्रिल रोजी होणारी राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
अर्ज भरण्यास मुदतवाढ
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) दि. २५ एप्रिलऐवजी दि. २३ एप्रिलरोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यासाठी दि. १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षेसाठी ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्रे भरली नसतील, त्यांनी दि. १० एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
अल्पेश भुवड यांचा भाजपमध्ये प्रवेश
दापोली : तालुक्यातील माैजे दापोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांविरोधात निवडणूक लढवून संपूर्ण तालुक्यात लक्ष वेधून घेणारे अल्पेश भुवड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भाजपाचा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर उपस्थित होते.
कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी
खेड : कोकण रेल्वे मार्गे गांधीधाम-नागरकोईल एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ही एक्स्प्रेस दि.२७ एप्रिल ते दि. ८ जून या कालावधीत धावणार आहे. वीस डब्यांची ही एक्स्प्रेस पूर्णपणे आरक्षित असणार आहे. ही एक्स्प्रेस दर मंगळवारी नागरकोईल येथून दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी सुटून सकाळी १२ वाजता गांधीधामला पोहोचेल.
दापोलीत पावसाचा शिडकावा
दापोली : दापोलीत गुरुवारी सकाळच्या सत्रात पावसाचा शिडकावा झाला. मात्र तयार फळांना या किरकोळ पावसाचा धोका नसल्याचे कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असते. सकाळी ७.३० वाजता ग्रामीण भागासह दापोलीत पावसाचा शिडकावा झाला. दिवसभर दापोलीतील वातावरण ढगाळ होते. मात्र शुक्रवारी वातावरण निवळले होते.
कार्यशाळेची सांगता
राजापूर : चाणक्य प्रोॲक्टिव्ह ॲबॅकस सेंटरतर्फे आयोजित सहादिवसीय मोफत कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी डाॅ. गायत्री कोळेकर, मुख्याध्यापिका मानसी हजेरी, श्रीया भोसले, ललिता भावे, विद्याधर पंडित उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धा घेऊन विजेत्या मुलांना पारिताेषिक देऊन गाैरविण्यात आले.
सुरेश खेडेकर यांची निवड
खेड : नवी दिल्लीतील श्री गुरू रविदास विश्व महापीठाने खेडचे सुपुत्र व संत रोहिदास समाज सेवा संघ राज्याध्यक्ष सुरेश खेडेकर यांची संस्थेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड केली आहे. तसे पत्रही राष्ट्रीय मंत्री नामदेव कदम यांनी दिले. खेडेकर हे संत रोहिदास समाज सेवा संघ राज्य व जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असून, त्यांनी चर्मकार समाजाच्या उत्कर्षासाठी गेली अनेक वर्षे काम केले आहे.