रत्नागिरीत महाआघाडीतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर; उद्धवसेनेने फसवणूक केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:32 IST2025-11-22T17:30:59+5:302025-11-22T17:32:54+5:30
Local Body Election: उद्धवसेनेचे नेते बाळ माने बोलतात एक व करतात दुसरे

रत्नागिरीत महाआघाडीतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर; उद्धवसेनेने फसवणूक केल्याचा आरोप
रत्नागिरी : रत्नागिरीमध्येमहाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीन पक्षांनी एकत्र येऊन घेतला होता. मात्र, उद्धवसेनेचे नेते बाळ माने बोलतात एक व करतात दुसरे. काँग्रेसला सोडलेल्या जागांवरही त्यांनी उद्धवसेनेचे उमेदवार उभे केले. या फसवणुकीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाआघाडीतून बाहेर पडत असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.
रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शुक्रवारी (दि. १९) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी आक्रमक भूमिका घेत आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
उद्धवसेनेचे बाळ माने पहिल्या दिवसापासून आमच्या संपर्कात होते. आम्ही सर्वांनी एकत्रित बसून चर्चा केली आणि सामंजस्याने जागा वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याला अतिशय कमी प्रमाणात जागा मिळाल्या. त्याही आम्ही सामंजस्याने स्वीकारल्या. आम्ही आमच्या उमेदवारांचे एबी फॉर्म भरले. मात्र तेव्हा बाळ माने यांनी आम्हाला दिलेल्या जागांसमोर उद्धवसेनेचे उमेदवार उभे केले असल्याचे समजले. याबाबत विचारणा केली असता, दि. २१ रोजी आपले उमेदवार अर्ज मागे घेतील, असे माने यांनी सांगितले.
आघाडी म्हणून त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी शुक्रवारी ३ वाजेपर्यंत माघार घेतली नाही. गुरुवारपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहुदा व्यस्त असल्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही. या फसवणुकीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आघाडीतून बाहेर पडत असल्याचे रमेश कीर व मिलिंद कीर यांनी जाहीर केले. आम्ही दोन काँग्रेस एकत्रितपणे ही निवडणूक लढवू आणि आमच्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित करू, असे त्यांनी सांगितले.