जाचक अटींमुळे कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:46+5:302021-05-31T04:23:46+5:30

- प्रशासन, पोलिसांकडून नियमांचा केला जातोय बाऊ लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : लॉकडाऊनचे जाचक नियम आणि अटी, ई-पास व ...

The condition of passengers traveling from Konkan to Mumbai due to oppressive conditions | जाचक अटींमुळे कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

जाचक अटींमुळे कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

- प्रशासन, पोलिसांकडून नियमांचा केला जातोय बाऊ

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : लॉकडाऊनचे जाचक नियम आणि अटी, ई-पास व प्रवाशांच्या कोरोना चाचणीची अट आणि पोलिसांकडून नियम व अटींचा बाऊ करत उगारला जाणारा कारवाईचा बडगा यामुळे गावाकडून मुंबईत जाणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांची परवड होत आहे. अनेकांना खासगी आरामबसमधून बसचा पास नाही, प्रवाशांचा कोरोना चाचणी अहवाल नाही म्हणून उतरविले जात आहे, तर एस़ टी़ च्या बसमधूनही २२ प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी असल्यास प्रवाशांना रस्त्यात उतरविले जात असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत़

कोरोना संसर्ग आणि त्यानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी गावी आले. कुणी खासगी बसने, तर कुणी खासगी गाड्या करून गावात दाखल झाले. आता १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता येणार असल्याची माहिती मिळताच पुन्हा एकदा चाकरमान्यांनी मुंबईला परतण्याची लगबग सुरू केली आहे. या चाकरमान्यांना सरकारच्या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रवासी वाहतुकीबाबत घालण्यात आलेल्या जाचक नियम व अटींचा फटका बसत आहे.

खासगी आरामबस चालकांना राजापूर व अन्य भागांतून मुंबईला प्रवासी वाहतूक करायची असेल तर ई-पास, तसेच गाडीतील सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल सोबत ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे याचा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसत आहे. शुक्रवारी राजापूर ओणी येथून सुटणाऱ्या अशा दोन खासगी बस चालकांविरोधात राजापूर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे प्रवाशांना उतरविण्यात आले व रात्री त्यांना घरी पाठविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई होत असल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, अशा अनेक बस मुंबई, पुण्यातून राजरोस प्रवासी वाहतूक करत आहेत, पण कोकणी माणसाला मात्र नियम आणि अटींचा बाऊ करत सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आराेप केला जात आहे़

खासगी बस वाहतूक बंद झाल्याने आता प्रवाशांनी एस़ टी़ ला पसंती दिली आहे. मात्र, कोरोना नियम आणि लॉकडाऊनमुळे एस़ टी़ चे ऑनलाईन आरक्षण बंद ठेवण्यात आले आहेत. त्यातच राजापूर आगारातून राजापूर-बोरिवली व राजापूर-नालासोपारा-अर्नाळा या दोन बस सकाळी सोडण्यात येत आहेत़ त्यातही केवळ प्रति बस २२ प्रवाशांचेच बंधन आहे. मात्र, २२ पेक्षा जास्त प्रवासी असले तर पोलिसांकडून त्यांनाही उतरविण्यात येत आहे. रविवारी राजापूर आगारातून अनेक प्रवाशांना गाडी नसल्याने मागे परतावे लागले आहे, तर लांजात राजापूर आगारातील एका मुंबई गाडीत चार ते पाच प्रवासी जास्त असल्याने त्यांना पोलिसांनी लांजात उतरविले़ त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले़

Web Title: The condition of passengers traveling from Konkan to Mumbai due to oppressive conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.