विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:33 AM2021-09-26T04:33:23+5:302021-09-26T04:33:23+5:30

लोकांपर्यंत पर्यटनाचे महत्त्व पोहोचवणे, विविध पर्यटन स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक मूल्यांच्या माहितीचे आदान-प्रदान करणे यासाठी १९८० सालापासून आपल्याकडे पर्यटन ...

Comprehensive Konkan tourism needed for development! | विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन !

विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन !

Next

लोकांपर्यंत पर्यटनाचे महत्त्व पोहोचवणे, विविध पर्यटन स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक मूल्यांच्या माहितीचे आदान-प्रदान करणे यासाठी १९८० सालापासून आपल्याकडे पर्यटन दिन साजरा होतो आहे. अलीकडे आपल्या देशाने जबाबदार प्रवासी (Responsible Traveler) बनविण्याचे लक्ष ठेवले असून, त्या पार्श्वभूमीवर इको टूरिझम सोसायटी ऑफ इंडिया (ESOI) चे रिस्पॉन्सिबल टूरिझम सोसायटी ऑफ इंडिया असे नामकरण करण्यात आले आहे. ग्रामीण पर्यटनातील संभाव्य संधींचा विचार करता कोकणसह महाराष्ट्रासाठी कोरोनोत्तर काळ ‘सुवर्णकाळ’ ठरू शकणार आहे.

एकीकडे सरकारचे पर्यटन धोरण हे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असेच असायला हवे. आरोग्य पर्यटनसारख्या विषयात केरळ, तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. नैसर्गिक संधी असताना आपण कधी यात पुढाकार घेणार? यासाठी शासन धोरण काय आहे? भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूरलिस्टमध्ये आजही कोकण दिसत नाही. अपवादात्मक काही कंपन्यांच्या लिस्टमध्ये तारकर्ली (स्नॉर्कलिंग) आणि गणपतीपुळे दिसू लागलंय. यातल्या तारकर्लीला २०११ साली आदरातिथ्यात देशात पहिला क्रमांक मिळाला होता. २०१५ साली तारकर्लीचा देशातील सर्वोत्कृष्ट सागरी किनारा म्हणून सन्मान झाला होता. असं असलं तरी तारकर्लीतील पर्यटन व्यवसाय हंगाम ६ ते ८ महिन्यांचा आहे. याकडे आम्ही कसे पाहतो? हे फार महत्त्वाचे आहे.

कोकणच्या सागर किनाऱ्यावरून मुंबई ते गोवा जाणाऱ्या देशातील पहिल्या लक्झरियस क्रुज सेवेला कोकणात थांबा नाही. जलवाहतुकीद्वारे पर्यटन सेवेत असलेल्या कोर्डेलिया क्रूझया कंपनीशी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) करार केला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात क्रूझ टर्मिनलची आवश्यकता असणार आहे. पर्यटनाच्या या नव्या आयामाला शुभेच्छा देताना याच कोकणातल्या दाभोळ बंदराची माहिती घ्यायला हवी आहे. दाभोळ ते गोवळकोट (चिपळूण) बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ किलाेमीटर आहे. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वांत नामांकित नौकायानतज्ज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहणी केली होती. भारतातील सर्वांत सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवलीत. त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मली नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे प्रसिद्ध झालेल्या ‘विश्व गॅझेटिअर’मध्येही दाभोळसंदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. इतक्या नैसर्गिक नोंदी उपलब्ध असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अख्खं जग सध्या ‘रिव्हेंज टूरिझम’साठी तयार होते आहे. लोकं प्रवासाची रिस्क घेऊ लागलेत. कोकण यासाठी तयार आहे का? थीमबेस्ड कोकणला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणण्यासाठी व्यापक विचार करावा. कोकणात राज्याचा आर्थिक विकास सांभाळण्याची शक्ती आहे. संकटे कितीही आली तरी कोकण रडणारा नाही लढणारा आहे. हे कोकणी स्पिरिट इथली संस्कृती आहे. जुलैच्या महापुरात ती दिसली आहे. ती पर्यटनातही दिसण्यासाठी कोकणाचा सर्वसमावेशक विचार झाल्यास इथल्या पर्यटन दिनाचे भविष्य उज्ज्वल आहे.

थीमबेस्ड हवेत

देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे तिथे आपल्याला प्लॅन्ड टूरिझम चालताना दिसते. दुबईसारखे ओसाड वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे आपल्याला ‘थीम्स’ भेटतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे आहे. जागतिक हेरिटेजचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदुर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात.

मार्केटिंग हवे

विजयदुर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉइंट पर्यटकांना पाहायला आवडतील. कोकणात मसाल्याचे बेट का होत नाही? आमच्या कर्नाळा आणि फणसाड या अभयारण्यांची उत्कृष्ट अशी ओळख का नाही? ॲडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरू झालं, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचं मार्केटिंग नीटसं झालं तर कोकणात परदेशी पर्यटक येईल.

‘प्रेझेंटेबल प्रॉडक्ट’ म्हणून पुढे यावे

कोकणात काही ठिकाणी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, काही ठिकाणी डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी सुरू असते; पण हे पुरेसे नाही. कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे. कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे.

- धीरज वाटेकर, चिपळूण

Web Title: Comprehensive Konkan tourism needed for development!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.