शहरातील नर्सरी, केजीच्या तीन हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:32 IST2021-05-26T04:32:13+5:302021-05-26T04:32:13+5:30
मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गेले सव्वा वर्ष नर्सरी ते ...

शहरातील नर्सरी, केजीच्या तीन हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गेले सव्वा वर्ष नर्सरी ते के.जी.पर्यंत मुले घरात आहेत. यावर्षीही जूनमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी नर्सरी ते के.जी़ पर्यंतचे वर्ग सुरू होण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शहरातील सव्वातीन हजार विद्यार्थी घरीच राहण्याची शक्यता आहे.
गतवर्षी मार्चपासून शाळा बंद आहेत. तेव्हापासून मुले घरी आहेत. गतवर्षी जूनमध्ये ऑनलाईन वर्ग सुरू होते. यावर्षीही प्रत्यक्ष वर्ग भरणे अशक्य असल्याने पुन्हा ऑनलाईनच वर्ग भरवले जाणार आहेत. गेले सव्वा वर्षे मुले घरात आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे शाळा नाही; परंतु अन्य कुठेही बाहेर जाणे होत नाही. त्यामुळे घरात राहून मुले कंटाळली आहेत. काही शाळा वर्षभर वयोगटानुसार अभ्यासक्रम राबवीत आहेत. मात्र या मुलांसाठी ‘हसत खेळत शिक्षण’ हीच संकल्पना योग्य आहे. ऑनलाईनद्वारे पालकांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून यावर्षीही अशाच पद्धतीने उपक्रम राबविण्याची तयारी शाळांनी केली आहे. मुले शाळेत जाता येणार नाही म्हणून नाराज आहेत. मोबाईलमुळे मुले बिघडत असल्याची तक्रार पालकांतून होत आहे.
गेले सव्वा ते दीड वर्ष मुलं पालकांबरोबर आहेत, हा सुवर्णकाळ आहे. पालक मात्र वैचारिक गोंधळात आहेत. वयोगटाप्रमाणे मुलांसाठी शिक्षण निश्चित केले असून पालकांच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम राबविण्याची गरज आहे.
- डाॅ. सचिन सारोळकर, मानसोपचारतज्ज्ञ, रत्नागिरी
नर्सरी, के. जी. हा शाळेचा पाया आहे. मुलांना अभ्यासाबरोबर संस्कार तसेच अनेक गोष्टी शिकवीत वळण लावण्याचा प्रकार होतो. ऑनलाईन वर्ग आवश्यक आहे.
- शिल्पा पटवर्धन, कार्याध्यक्षा, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी,
मोबाईलमुळे मुलांच्या डोळ्यांवर, मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे पालकांच्या माध्यमातून विविध उपक्रम, अक्षरओळख केली जाते. वयोगटानुसार अभ्यास तयार करण्यात आला असून तो राबविला जात आहे.
- अशफाक नाईक, मुख्याध्यापक,
एम. डी. नाईक, स्कूल.
कोरोनाकाळात मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही ‘हसत खेळत शिक्षण’ देत असून, त्यासाठी मुलांबरोबर पालकांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. वयोगटानुसार अभ्यासक्रम गरजेचे आहेत.
- कीर्तिकुमार देशमुख, मुख्याध्यापक, पोद्दार स्कूल.
मोबाईलद्वारे मुलांचा अभ्यास घेण्यात असला तरी मुलांना मोबाईलची सवय झाली असून दिवसभर मोबाईलमध्ये मग्न राहत आहेत.
- नादिया डिंगणकर, पालक
ऑनलाईन वर्ग सुरू असले तरी मुले फार आळशी झाली आहेत. मुले खेळ विसरली असून खेळही मोबाईलवरच खेळत आहेत. त्यामुळे मुलांचे वजन वाढत आहे.
- सानिका पाटील, पालक
ऑनलाईन वर्ग गेले वर्षभर सुरू होते. वर्ग संपले तरी मोबाईलकडे फारच आकर्षण वाढले असून त्यामुळे त्यांना जेवतानाही मोबाईल लागत आहे.
- श्वेता जोशी, पालक