व्यथा काजू उत्पादकांच्या: आंब्याप्रमाणेच काजूलाही हवामानाचा मोठा फटका, मात्र..
By मेहरून नाकाडे | Updated: April 21, 2025 18:36 IST2025-04-21T18:35:14+5:302025-04-21T18:36:12+5:30
मेहरून नाकाडे रत्नागिरी : पांढरं सोनं म्हणून जिल्ह्याच्या अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा असलेले काजू उत्पादन काळवंडले आहे. पर्यावरणात होणाऱ्या प्रतिकूल ...

व्यथा काजू उत्पादकांच्या: आंब्याप्रमाणेच काजूलाही हवामानाचा मोठा फटका, मात्र..
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : पांढरं सोनं म्हणून जिल्ह्याच्या अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा असलेले काजू उत्पादन काळवंडले आहे. पर्यावरणात होणाऱ्या प्रतिकूल बदलामुळे आणि विविध कीडरोग समस्यांनी हापूस आंब्याप्रमाणे काजू पीकही ग्रासले आहे. यावर्षी हापूसप्रमाणे काजू उत्पादन घटले आहे. यावर्षी ४० टक्केच पीक असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात पीक कमी असले तरी काजूच्या आयातीचे प्रमाण घटल्याने काजूचा दर समाधानकारक असल्याने बागायतदारांना तेवढाच दिलासा मिळाला आहे.
आंबा पिकाची जेवढी काळजी घ्यावी लागते, तेवढी काजूची घ्यावी लागत नाही. त्यापासून मिळणारे उत्पन्न हे आंब्याच्या तुलनेत कमी कष्टाचे आहे. पण, अलीकडच्या काळात हवामानातील बदलाचे परिणाम आंब्याप्रमाणे काजूवरही परिणाम करीत आहेत. त्यामुळे काजूच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ लागला आहे. यंदा या उत्पादनात मोठी घट दिसत आहे.
अर्थात उत्पादन कमी असले तरी चांगल्या दरामुळे बागायतदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.
काजू हंगामाची सुरुवात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून झाली. सुरुवातीला काजूला १७५ ते १८० रुपये दर मिळाला. बाजारातील आवक वाढली तशी दरात हळूहळू घट झाली. सध्या १५० ते १५५ रुपये दर आहे. मात्र, हा दर वेंगुर्ला ७ व ९ या जातीच्या काजू बीयास मिळत आहे. ही बी आकाराने मोठी आहे.
परंतु, यावर्षी हवामानातील बदलामुळे वेंगुर्ला बी चा आकार कमी झाला आहे. त्यामुळे काजू बी विकत घेणारे व्यापारी वेंगुर्ला काजूची गणती गावठी काजू प्रकारात करू लागले आहे. वेंगुर्ला असल्याचे सांगूनही व्यापारी ऐकत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे.
विक्रेत्यांकडून फसवणूक
काजू बी विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. दारावर येऊन काजू विकत घेत आहेत. परंतु, काजू मोजण्यासाठी वापरणाऱ्या काट्यात छेडछाड केली जाते. यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. यावर नियंत्रण गरजेचे आहे.
आयात झाली कमी
दरवर्षी परदेशातून काजू बी मोठ्या प्रमाणावर भारतात आयात केली जाते. आयात होणाऱ्या काजू बीचा स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या दरावर प्रभाव राहतो. त्यातून स्थानिक काजूचा प्रती किलो दर घटून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसतो. मात्र, यावर्षी काजू बी आयात कमी झाल्याने काजू बी दर मात्र समाधानकारक आहे.
प्रतिकूल हवामानामुळे काजूचे यावर्षीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे काजू हंगामासाठी केलेला खर्च व उत्पादन याचा मेळ बसविण्याची चिंता असताना काजू बीयास समाधानकारक दर मिळत असल्याने तेवढाच दिलासा मिळाला आहे. - संतोष गोनबरे