खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या तिघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (१८ मार्च) सायंकाळी घडली.सुरेश जालिंदर मोहिते, संभाजी परशुराम मोहिते व शीतल सुरेश मोहिते अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी तुषार गणेश खडोळ (वय २६, रा. उपजिल्हा रुग्णालय कळंबणी, ता. खेड) यांनी तक्रार दिली आहे. एक महिला १८ मार्चला डोक्याला मार लागल्यामुळे औषधोपचारासाठी नातेवाइकांसोबत आली होती. तुषार खडाेळ यांनी रुग्णाला अपघात कक्षात उपचारांसाठी दाखल केले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास डॉ. अनिकेत खडोळ हे त्यांच्या कामानिमित्त दवाखान्यात येऊन अपघात विभागात त्यांचे काम करीत होते.जखमी महिलेवर उपचार करीत असताना सुरेश मोहिते व संभाजी परशुराम मोहिते हे तिथे आले. त्यांनी तुषार खडाेळ यांना ‘तुम्ही आमच्या पेशंटवर नीट औषधोपचार करीत नाही, आमच्या औषधोपचाराच्या कागदपत्रात फेरफार करताय,’ असे बोलून मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले. तसेच ‘आम्ही तुमचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकतो,’ अशी धमकी देऊन तुषार खडाेळ यांचे चित्रीकरण केले.यावेळी तुषार खडाेळ, कर्मचारी व डॉ. अनिकेत खडाेळ यांनी ‘तुम्ही शांत राहा, आम्हाला पेशंटवर औषधोपचार करूद्या,’ असे सांगितले. मात्र, काही न ऐकता त्यांनी आरडाओरड करून दवाखान्यातील इतर रुग्णांना त्रास होईल, असे वर्तन केले. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून खेड पाेलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
Ratnagiri: कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकांचा गोंधळ, तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:06 IST