रत्नागिरी : परत गेलेले कुरिअर थांबविण्यासाठी लिंक पाठवून त्याद्वारे प्रौढाच्या खात्यातील तब्बल ९९ हजार रुपये लंपास करण्याचा प्रकार शनिवारी दुपारी उमरे (ता. रत्नागिरी) येथे घडला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल हरी सनगरे (वय ४०, मूळ रा. मनवेलपाडा, विरार पूर्व, जि. पालघर, सध्या रा. उमरे, रत्नागिरी) यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. ते मीरा भाईंदर येथील एका कंपनीत नोकरीला आहेत. त्यांच्या कंपनीचे मारुती कुरिअरमध्ये आलेले कुरिअर उमरे येथे आले होते. मात्र, तेथील कार्यालयात ते हजर नसल्याने ते कुरिअर परत गेले. सनगरे यांनी गुगल सर्चवरून मारुती कुरिअरचा ७९८०३७४०९३ हा नंबर मिळवून त्यावर फोन केला. त्यावेळी हिंदी भाषेमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने ‘तुमचे कुरिअर थांबवायचे असेल तर पाच रुपये पाठवा’, असे सांगितले. त्यानंतर सनगरे यांनी त्यांना पाच रुपये पाठविले. परंतु, ते फेल गेल्याने त्या व्यक्तीने सनगरे यांच्या मोबाइलवर लिंक पाठवली. ही लिंक सनगरे यांनी स्वीकारताच त्यांच्या वसई विकास सहकारी बॅंकेतील खात्यातून आधी ९० हजार आणि थोड्यावेळाने ९ हजार असे एकूण ९९ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्यात आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्थानकात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Ratnagiri Crime: गुगल सर्चवरून कुरिअरच्या नंबरवर फोन केला, अन् ९९ हजाराला फटका बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 12:46 IST