दापोली : तालुक्यातील केळशी आणि आंजर्ले अशा दोन समुद्रकिनारी बुधवारी दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन्ही मृतदेह समुद्रातून वाहून आले आहेत. मात्र त्यांची ओळख पटलेली नाही.बुधवारी सकाळच्या सुमारास केळशी समुद्रकिनारी ग्रामस्थांना मृतदेह आढळला. याबाबतची माहिती पोलिस पाटलांनी तत्काळ पोलिसांना दिली. पोलिस त्याचा पंचनामा करत असतानाच आंजर्ले येथे आणखी एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन मृतदेह सापडल्यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.दोघेही समुद्रातूनच वाहून आले असल्याने त्यांची ओळख सांगणारी काहीही कागदपत्रे पोलिसांना मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. आसपासच्या कोणत्याही भागात मच्छीमार किंवा स्थानिक ग्रामस्थ बेपत्ता असल्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे या व्यक्ती स्थानिक नसाव्यात, असा प्राथमिक अंदाज आहे. आता नजीकच्या तालुक्यात तसेच रायगड जिल्ह्यातही याबाबत माहिती घेतली जाणार आहे. पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
मृतदेहापाशी बॅगयातील एका मृतदेहानजीक बॅग (स्कूल बॅगसारखी सॅक) आढळली आहे. त्यात काय होते, याची माहिती अजून उघड करण्यात आलेली नाही. दोन्ही मृतदेह भरतीच्या पाण्यासोबत वाहून आले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मच्छीमार असण्याची शक्यतागेले दोन दिवस वादळसदृश वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यावेळी मासेमारी करत असलेल्या एखाद्या बोटीतील हे दोन खलाशी असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही मृत व्यक्तींचा चेहरा पाण्यात राहिल्यामुळे सुजला आहे. दापोली पोलिसांनी रत्नागिरी जिल्हा मुख्यालयासह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे मुंबई, पालघर अशा सर्व ठिकाणच्या पोलिसांना संदेश पाठवला आहे. त्यातून या दोघांची ओळख पटेल, अशी अपेक्षा आहे.