Ratnagiri: वादळामुळे कळाशी समुद्रात बोट बुडाली, सुदैवाने ६ खलाशांना वाचविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:08 IST2025-09-20T12:07:24+5:302025-09-20T12:08:05+5:30
स्थानिक मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण

Ratnagiri: वादळामुळे कळाशी समुद्रात बोट बुडाली, सुदैवाने ६ खलाशांना वाचविण्यात यश
देवगड : तालुक्यातील कळाशी समुद्र परिसरात गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेली राजेंद्र बाळकृष्ण भिलारे यांची ‘त्रिवेणी’ (नोंदणी क्रमांक : आयएनडी-एमएच-५-एमएम ७३२) ही मासेमारी बोट वादळी वाऱ्यामुळे बुडाल्याची घटना घडली. या अपघातामुळे बोटीसह त्यावरील साहित्याचे अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, बोटीवरील सर्व ६ खलाशांना सुखरूप वाचविण्यात यश आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या वादळी वाऱ्याच्या सूचनेनंतर त्रिवेणी बोट देवगड बंदराकडे परत येत होती. मात्र, कळाशी परिसरात अचानक तीव्र वादळी वारे सुरू झाल्याने बोटीच्या खालील बाजूच्या दोन फळ्या निघून गेल्या आणि बोटीत पाणी शिरले, असे बोटीचे तांडेल बसप्पा कुरे (वय ४३) यांनी सांगितले. त्यांनी तत्काळ वायरलेसद्वारे जवळील ‘देवयानी’ या बोटीला मदतीसाठी संपर्क साधला. देवयानी बोटीच्या तांडेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दाेरीच्या साहाय्याने त्रिवेणी बोटीवरील तांडेलांसह ६ खलाशांना सुखरूप बाहेर काढले.
या घटनेत बोट पूर्णपणे बुडाल्याने ती वाचविणे शक्य झाले नाही. बोटीवर ३ बॅरेल डिझेल, ४ डिस्को जाळे, वायरलेस उपकरण, आउटर बोर्ड (पाटे), टप, गॅस सिलिंडर, भांडी, दोरी आणि अंदाजे ३० क्रेट यांचेही नुकसान झाले. यामुळे बोटीचे मालक राजेंद्र भिलारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच, साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी सागरी सुरक्षा रक्षकांसह घटनास्थळी भेट देऊन मालक आणि खलाशांची विचारपूस केली. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती गोळा करून १९ सप्टेंबर रोजी सकाळी मोका पंचनामा केला. अहवाल, बोटीची कागदपत्रे आणि छायाचित्रांसह साहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मालवण यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येणार आहे.
या घटनेमुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी हवामान सूचनांचे काटेकोर पालन आणि सागरी सुरक्षा उपाययोजनांवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.