जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या ‘जोरबैठका’
By Admin | Updated: July 13, 2016 00:47 IST2016-07-12T21:48:19+5:302016-07-13T00:47:57+5:30
जिल्हा परिषद : सेनेचे वर्चस्व मोडीत काढण्याची तयारी...

जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या ‘जोरबैठका’
प्रकाश वराडकर -- रत्नागिरी -गेल्या १५ वर्षांपासून जिल्हा परिषदेवर असलेले शिवसेनेचे वर्चस्व येत्या निवडणुकीत मोडीत काढण्याचा चंग भाजपच्या नेत्यांनी बांधला आहे. स्वबळाचा नारा देत भाजपने या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात पक्षाच्या तालुकावार बैठका सुरू आहेत. संघटनेची शिस्तबध्द बांधणी करतानाच निवडणूक स्ट्रॅटेजीही ठरवली जात आहे. भाजपच्या या ‘जोर बैठकां’कडे शिवसेना मात्र थंडपणाने पाहत असल्याचे राजकीय चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील सेना - भाजप युती तुटली होती. त्याचा जिल्ह्यातील सेना भाजपमधील संबंधांवर मोठा परिणाम झाला होता. जिल्हा परिषदेत सेना भाजप युतीची सत्ता आहे. त्यामुळे भाजपचे सतीश शेवडे यांना सव्वा वर्षासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देण्यात आले. मात्र, युती तुटल्याने भाजपने हे पद सव्वा वर्षानंतरही सोडले नाही. त्याचा राग सेनेमध्ये आहे. जिल्ह्यात या-ना त्या कारणाने सेना भाजपमधील वाद विकोपास गेल्याने त्यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांच्या तयारीसाठी चिपळूणच्या बैठकीतही भाजपने जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला आहे.
सेना व मित्र पक्षांबरोबर युती करायची असेल, तर स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांनी निर्णय घ्यावा. मात्र कॉँग्रेस, राष्ट्रवादीशी युती करू नये, असा ठरावही पुणे येथे जूनमध्ये झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप व सेनेमधील कडवटपणा पाहता जिल्हा परिषदेत युती होईल, अशी शक्यता नाही. जिल्हा परिषदेतील सेनेचे वर्चस्वही मोडीत काढण्याची तयारी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने सुरू केली आहे.
निवडणुकीत महिलांना ५० टक्के प्रतिनिधीत्व मिळणार असल्याने भाजपकडून तालुकावार महिलांच्या बैठकाही सुरू आहेत. लांजा, राजापूरमध्ये अशा बैठका याआधीच झाल्या असून, चिपळूण, खेडमध्ये १४ व १५ जुलैला भाजपतर्फे महिलांच्या बैठका होणार आहेत. जिल्ह्यात महिलांची फळी उभी करून त्यातून महिला उमेदवारही निश्चित केले जात आहेत. भाजपची सेनेबरोबर युती होणार नसली तरी रामदास आठवले यांना भाजपने केंद्रात मंत्रीपद दिल्याने रिपब्लिकन पार्टी आठवले गटाला जिल्ह्यात भाजपबरोबर यावे लागणार आहे. गवई गट कॉँग्रेसबरोबर जाऊ शकतो, तर बसपाची कॉँग्रेसशी आघाडी होऊ शकते. मात्र, सेनेला एकट्याने निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने प्रतिष्ठापणाला लागणार आहे.
युती नाहीच!
शिवसेना कार्यकर्त्यांना भाजपबरोबर युती नको आहे, तर भाजपचे कार्यकर्तेही सेनेबरोबर युती करण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करावा लागणार, हे निर्विवाद सत्य आहे. युती होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे भाजप - शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर दंड थोपटून उभे राहणार आहेत. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये एकमेकांवर होणारी चिखलफेक पाहायला मिळणार आहे.