मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 16:33 IST2020-09-28T16:33:06+5:302020-09-28T16:33:46+5:30
रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या गळ्यात फलक बांधून नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी भाजपचे आंदोलन
रत्नागिरी : रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या गळ्यात फलक बांधून नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.
१५ दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील मोकाट जनावरे आणि उनाड श्वानांचा बंदोबस्त करा, अन्यथा जनावरे पकडून कार्यालयात सोडू, असा इशारा देण्यात आला होता. मुख्याधिकारी यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देऊनही मोकाट जनावरांचा आणि श्वानांचा त्रास रत्नागिरी शहरातील नागरीकांना सहन करावा लागत आहे.
जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्याबाबत नगरपरिषद प्रशासन आणि प्रमुख पदाधिकारी उदासीन असल्यामुळे भाजप रत्नागिरी शहरातर्फे सोमवारी शहरभर रस्त्यात ठाण मांडुन बसलेल्या जनावरांच्या गळ्यात अकार्यक्षम लोकप्रनिनिधी आणि प्रशासन यांचा जाहीर निषेध असल्याचे फलक अडकविण्यात आले.
तसेच मारुतीमंदिर येथे भाजपा शहर कार्यकर्त्यांनी जनतेच्या हिताची कामे करा, अन्यथा खुर्च्या खाली करा, रत्नागिरी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. नगर परिषद प्रशासन आणि कारभाऱ्यांनी मोकाट जनावरे आणि उनाड श्वान यांच्यावर तीव्र मोहीम राबवून बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. हे आंदोलन करताना राजीव कीर, भैया मलुष्टे, प्रशांत डिंगणकर, अशोक वाडेकर, ययाती शिवलकर, बंड्या भाटकर, मनोज कीर, ज्योतीप्रभा पाटील उपस्थित होते.