वाळूमाफियांना मोठा दणका: संगमेश्वरनजीक ६ सक्शन पंप, ४ बोटी तहसीलकडून उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:40 IST2019-05-09T21:38:34+5:302019-05-09T21:40:43+5:30
अधिकारीवर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे वाळूमाफियांनी संगमेश्वर तालुक्यात धुडगूस घातला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांमध्ये महसूल विभागाच्या वतीने तीन वेळा कारवाई करण्यात आली आहे.

वाळूमाफियांना मोठा दणका: संगमेश्वरनजीक ६ सक्शन पंप, ४ बोटी तहसीलकडून उद्ध्वस्त
देवरूख : अधिकारीवर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे वाळूमाफियांनी संगमेश्वर तालुक्यात धुडगूस घातला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांमध्ये महसूल विभागाच्या वतीने तीन वेळा कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी करजुवे खाडीपट्ट्यामध्ये महसूल विभागाने वाळूमाफियांना दणका देत धडक कारवाई केली. यामध्ये ६ सक्शन पंप व ४ बोटी उद्ध्वस्त केल्या. आजपर्यंत करण्यात आलेल्या कारवायांमधील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे विचारेकोंड शाळेजवळ तसेच धामापूर, नारडुवे, कळंबुशी या ठिकाणी गेले काही दिवस सक्शन पंपाच्या माध्यमातून अवैध वाळूू उत्खनन सुरू होते. याची माहिती मिळताच देवरूख तहसीलच्यावतीने चार- पाच वेळा धाड टाकून कारवाई करण्यात आली. तरीही सक्शन पंपाने अवैध वाळूउपसा सुरूच होता.
याविषयी महसूल विभागाकडे तक्रार येताच विभागाच्या वतीने धाडसत्र राबवले जात होते. यापूर्वी १९ व २० एप्रिल रोजी टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ७० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला होता, तर अज्ञात वाळूमाफियांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर ३० एप्रिल व १ मे या दोन दिवसांत केलेल्या कारवाईमध्ये दोन सक्शन पंप ताब्यात घेण्यात आले होते. हे जप्त केलेले सक्शन पंप पोलीसपाटलांच्या ताब्यात देण्यात आले होते. असे असताना हे पंप रातोरात गायब करून वाळू उत्खननासाठी वापर होत होता आणि दिवसा हे पंप जागेवरच ठेवण्यात येत होते. या वाळूउपशाविरूध्द तक्रारी वाढतच होत्या.
या तक्रारी लक्षात घेऊन प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे तहसीलदार संदीप कदम यांच्या पथकाने बुधवारी वाळूमाफियांना दणका दिला. यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. परजिल्ह्यातील व्यापारी या ठिकाणी दांडगाई करत असल्याची चर्चा आहे.बुधवारी केलेल्या या कारवाईत हायड्रा (क्रेन) च्या सहाय्याने सहा सक्शन पंप खाडीतून बाहेर काढून तोडण्यात आले, तर चार बोटी गॅस कटरच्या सहाय्याने कापून टाकण्यात आल्या. या कारवाईकरिता देवरूख महसूल विभागाने हायड्रा, गॅस कटर आणि टेम्पो यांचा वापर करण्यात आला. या साहित्याच्या सहाय्याने तब्बल १५ जणांच्या पथकाच्या या मोहिमेमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
चार बोटी, सहा सक्शन पंप निकामी करण्याबरोबरच ५४ ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. सहा सक्शन पंपामध्ये पूर्वी जप्त करून गुन्हा दाखल असलेल्या दोन पंपांचा समावेश आहे. हे दोन्ही सक्शन पंप क्रेनच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर काढण्यात आले. यातील मोठ्या असलेल्या एका पंपाचे इंजिन काढून ठेवण्यात आले आहे. दोन्ही पंप पोलीसपाटलांच्या घरी नेवून ठेवण्यात आले आहेत. या कारवाईकरिता वापरण्यात आलेल्या गॅस कटरकरिता गॅसचे तीन नळकांडी संपल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.
बुधवारी करण्यात आलेली कारवाई संगमेश्वर पोलिसांना सोबत घेऊनच करण्यात आली. या कारवाईला सकाळी ९.३० वाजता सुरूवात झाली ती रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू होती. या कारवाईमध्ये चार बोटी आणि सहा पंप निकामी झाले. सुमारे ३० लाखांचे साहित्य या कारवाईत तोडून टाकण्यात आले. तहसीलदार संदीप कदम यांच्यासमवेत मंडल अधिकारी एम. ई. जाधव, एन. डी. कांबळे, सी. एस. गमरे, अव्वल कारकून नीलेश पाटील, तलाठी सी. एम. मांडवकर, व्ही. आर. सराई, यु. एस. माळी, एस. एच. शिंदे, बी. डी. चव्हाण, डी. के. साळवी या महसूलच्या पथकाबरोबरच माखजन दूरक्षेत्राचे पोलीस सागर मुरूडकर व उशांत देशमवाढ यांनी ही कारवाई केली. याबाबत अधिक तपास सुरु आहे.
दुसरे पथक पाठवले, रिकामे माघारी परतले
करजुवे येथील विचारेकोंड-शाळेनजीक एका पथकाकडून कारवाई चालू असतानाच धामापूर, नारडुवे, कळंबुशी याठिकाणीदेखील दुसरे पथक कारवाईकरिता पाठवण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी कु ठेही सक्शन पंप लावल्याचे आढळून आले नाही. कदाचित करजुवे येथे कारवाई होत असल्याचा सुगावा लागल्यामुळे येथील वाळूउपसा बंद करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. धाड टाकतेवेळी कोणीही आढळून येत नाही. केवळ वाळू काढण्याकरिता वापरण्यात येत असलेले साहित्य सापडते. चाहुल लागताच वाळूमाफिया पोबारा करत असल्याचेच आजवरचे चित्र आहे.