Ratnagiri Crime Marathi: दोन आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या भक्ती मयेकरच्या हत्येच्या घटनेने रत्नागिरी हादरली. पोलिसांना रत्नागिरीपासून ७० किमी अंतरावर असलेल्या आंबा घाटातील गायमुखजवळील खोल दरीत तिचा मृतदेह सापडला. भक्ती आणि दुर्वास पाटील यांचे प्रेमसंबंध होते आणि ती गर्भवती होती. लग्नाचा तगादा लावला म्हणून दुर्वासने भक्तीला संपवले. बेपत्ता भक्तीचा तपास करत असताना पोलिसांना तपासात भक्तीचे शेवटचे लोकेशन मिळाले. तेव्हा पोलिसांना संशय आला आणि नंतर दुर्वास पाटीलच्या क्रूर कृत्याचा पर्दाफाश झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रत्नागिरी शहरात राहणारी भक्ती मयेकर ही दोन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाली. २१ ऑगस्ट रोजी तिच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. मैत्रिणीकडे चालली आहे, असं सांगून भक्ती घरातून बाहेर पडली होती. पण, ती परत आलीच नाही.
भक्तीचे शेवटचे ठिकाण आणि दुर्वास पाटील अडकला
भक्ती १७ ऑगस्ट रोजी घरातून बाहेर पडली होती. त्यामुळे पोलिसांनी तिचा सगळीकडे शोध सुरू केला. पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मैत्रिणींकडेही चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी भक्तीचे मोबाईल लोकेशन शोधले. १८ ऑगस्ट रोजी भक्ती खंडाळा परिसरात असल्याचे मोबाईल लोकेशनवरून कळले.
त्यामुळे पोलिसांनी भक्ती खंडाळा कशाला गेली, याचा तपास सुरू केला. त्यातून दुर्वास पाटील हा भक्तीचा प्रियकर असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली. पोलिसांनी थेट खंडाळा गाठून दुर्वास पाटीलला ताब्यात घेतले आणि चौकशी केली.
दुर्वास पाटीलची उडवाउडवीची उत्तरे
मूळचा कोल्हापूरचा असलेला दुर्वास पाटील (वय ३०) हा खंडाळ्यात राहतो. त्याचं खंडाळ्यामध्ये बार आणि दारूचे दुकान आहे. पोलिसांनी दुर्वास पाटीलला ताब्यात घेतले. त्याने उडवाउडवीची उत्तरे देत असे काही केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय वाढला.
पोलिसी खाक्या दाखवताच दुर्वास पाटीलला तंतरली आणि त्याने भक्ती मयेकरची हत्या केल्याची कबूली दिली. दोन मित्रांच्या मदतीने भक्तीची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह आंबा घाटातील गायमुख जवळ असलेल्या खोल दरीत फेकला.
दुर्वास पाटीलला मदत करणारे ते दोघे कोण?
भक्तीची हत्या करून तिचा मृतदेह फेकून देण्यासाठी दुर्वास पाटीलला ज्या दोघांनी मदत केली, पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. विश्वास विजय पवार आणि सुशांत शांताराम नरळकर अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी अटक केलेले तिघेही सध्या खंडाळात राहतात.
भक्ती होती गर्भवती
दुर्वास पाटील आणि भक्ती मयेकरचे प्रेमसंबंध होते. तपासातून अशी माहिती समोर आली की, भक्ती गर्भवती होती. त्यामुळे तिने दुर्वास पाटीलकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. दुर्वास पाटीलला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. त्यामुळे तिला संपवण्याचा निर्णय त्याने घेतला आणि १८ ऑगस्ट रोजी तिची हत्या केली.