Ratnagiri: बांग्लादेशी महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:42 IST2025-04-03T17:41:54+5:302025-04-03T17:42:47+5:30
रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधरीत्या वास्तव्य केल्याचा आरोप असलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सलमा ...

Ratnagiri: बांग्लादेशी महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधरीत्या वास्तव्य केल्याचा आरोप असलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सलमा खातून बिलाल मुल्ला ऊर्फ सलमा राहिल भोंबल (वय ३०, रा. साळवी स्टॉप रत्नागिरी, मूळ रा. बांगलादेश) असे या महिलेचे नाव आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी तिला दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती.
अडीच महिने कारागृहात असलेल्या सलमाने जामिनासाठी सत्र न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सलमा १६ डिसेंबर २०१६ रोजी ९० दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली होती. यावेळी तिचे वास्तव्य शृंगारतळी (गुहागर) येथे होते. यानंतर सलमाने राहिल भोंबल याच्याशी विवाह केला. व्हिसाची मुदत संपली असतानाही तिने २०१७ ते २०२५ या कालावधीत अवैधरीत्या भारतात वास्तव्य केले.
सलमाने आधार कार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला, आदी बनावट कागदपत्रे तयार करत भारतात वास्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. तिला १७ जोनवारी रोजी साळवी स्टॉप येथून अटक करण्यात आली होती. संशयित आरोपी ही एक महिला आहे, तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. जामीन दिल्यास पोलिसांच्या तपासकार्यात सहकार्य केले जाईल. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन केले जाईल, असे सलमाच्या वतीने वकिलांनी मांडले.
सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. संशयित आरोपीने केवळ भारतात अवैध वास्तव्य केले नाही, तर तिने बनावट कागदपत्रे तयार करून घेतली आहेत. याकामी तिला अन्य कुणीतरी मदत केली असण्याची शक्यता आहे. ही बाजू मान्य करून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.