रत्नागिरी : शहरालगतच्या एका श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीतून बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई येथे बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांवरून ही बाब समोर आली. दरम्यान, याप्रकरणी जन्म दाखला देणाऱ्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांना मुंबई पाेलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.मोहम्मद इद्रीस इसाक शेख असे मुंबई पोलिसांकडून अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. मुंबई पोलिसांकडून शेख याला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याजवळ रत्नागिरीतील एका ग्रामपंचायतीतून जन्म दाखला दिल्याचे आढळले. त्याच्या जन्म दाखल्यावर जन्म १ मे १९८३ रोजी असा उल्लेख असून, उद्यमनगर पडवेकर कॉलनी, ता. जि. रत्नागिरी असा पत्ता आहे. तसेच आईचे नाव शाहिदा बेगम मोहम्मद इसाक शेख व वडिलांचे नाव मोहम्मद इसाक शेख असे टाकण्यात आले आहे.पोलिसांच्या तपासामध्ये शेख याने खोटा जन्म दाखला तयार केल्याचे आढळले आहे. हा दाखल रत्नागिरीनजीकच्या श्रीमंत समजल्या जाणाऱ्या एका ग्रामपंचायतीतून देण्यात आल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पाेलिसांचा तपास रत्नागिरीपर्यंत येऊन पाेहाेचला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत जन्म दाखला देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाला चाैकशीसाठी मुंबईत बाेलावले आहे. त्याबाबतचे पत्र रत्नागिरीत दाखल हाेताच एकच खळबळ उडाली आहे.
बांगलादेशीला रत्नागिरीत जन्म दाखला; मुंबई पोलिसांकडून तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:50 IST