शेतकऱ्यांसाठी ‘बुरे दिन’

By Admin | Updated: June 17, 2015 00:40 IST2015-06-16T23:21:29+5:302015-06-17T00:40:34+5:30

संजय कदम : जिल्हा परिषद भेटीप्रसंगी पत्रकारांशी संवाद

'Bad days' for farmers | शेतकऱ्यांसाठी ‘बुरे दिन’

शेतकऱ्यांसाठी ‘बुरे दिन’

रत्नागिरी : आघाडी शासनाच्या काळात शेतकऱ्यांना भातबियाण्यासाठी ७५ टक्के सबसिडी देण्यात येत होती. मात्र, आताच्या शिवसेना-भाजप युती शासनाकडून भातबियाण्यांसाठी शेतकऱ्यांना दमडीही दिली जात नसल्याने शेतकऱ्यांसाठी बुरे दिन सुरू झाले असल्याचे दापोली - मंडणगड - खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय कदम यांनी सांगितले.
आमदार कदम यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी युती शासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. युती शासनाच्या कालावधीत जनतेची गळचेपी होत असून, महागाईचा आगडोंब उडाला आहे. तसेच शेतकरीही देशोधडीला लागरे, असा आरोप करुन ते पुढे म्हणाले, पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर स्वत:चे जुने बियाणे करुन शेती करण्याची वेळ आली आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने शेतकऱ्यांना भात बियाण्यासाठी एक रुपयाही सबसिडी दिलेला नाही. पूर्वीचे शासन शेतकऱ्यांना खरीप हंगामात ७५ टक्के अनुदानावर भात बियाणं देत होते. मात्र, यंदा शासनाने शेतकऱ्यांची निराशा केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात आंबा महोत्सवावर खर्च करण्यापेक्षा ते पैसे भात बियाण्यावर खर्च करुन शेतकऱ्यांना दिले असते तर गरीब शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. मात्र, नटनट्या नाचवून जनतेला काय फायदा झाला, असा प्रश्नही आमदार कदम यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद किंवा जिल्हा नियोजन मंडळातून नियोजन करुन भातबियाण्यासाठी तरतूद करुन ते देणे आवश्यक होते, मात्र, तेही केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आयटीआयमधील मागासवर्गीयांसाठी असणारे १८० रुपये शुल्क रद्द करुन ते २८०० रुपयांपेक्षा जास्त केले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक फीचा भुर्दंड भरावा लागत आहे. हे शासन नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करुन कोकणातील बागायतदारांसाठी आंबा नुकसान भरपाई ६० कोटी देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोपही कदम यांनी केली. (शहर वार्ताहर)


सरकारच्या धोरणांचा निषेध
शासनाच्या विरूध्द आमदार संजय कदम यांनी तोफ डागली. विविध प्रश्नांवर सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर कोकणातील शेतकऱ्यांना सरकार न्याय देऊ शकले नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. आघाडी सरकारने बियाण्यासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के सबसिडी दिली. आताच्या सरकारने दमडीही दिली नाही. या सरकारकडून कोणती अपेक्षा करायची, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

Web Title: 'Bad days' for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.