रत्नागिरीत उन्हाळ्यात यंदाही हंडा डोक्यावरच, निधी थकल्याने ठेकेदारांनी बंद केली ‘जलजीवन’ची कामे

By रहिम दलाल | Updated: February 10, 2025 16:40 IST2025-02-10T16:39:51+5:302025-02-10T16:40:20+5:30

रहीम दलाल रत्नागिरी : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यात आली ...

As the bills remained outstanding, the contractors stopped the work of Jaljeevan Yojana in Ratnagiri | रत्नागिरीत उन्हाळ्यात यंदाही हंडा डोक्यावरच, निधी थकल्याने ठेकेदारांनी बंद केली ‘जलजीवन’ची कामे

संग्रहित छाया

रहीम दलाल

रत्नागिरी : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र, कामे पूर्ण होऊनही शासनाकडून ७० कोटी रुपयांची ठेकेदारांची बिले थकीत राहिल्याने शेवटच्या टप्प्यात असलेली अनेक कामे ठेकेदारांनी बंद केली आहेत. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यातही महिलांच्या डोक्यावर हंडा कायम राहणार आहे.

जलजीवन मिशन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १ हजार ४३२ पाणीपुरवठा योजनांपैकी ४३९ कामे पूर्ण झाली आहेत, तर ३१९ याेजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर, २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या कालावधीत कामे पूर्ण न झाल्याने या कामांना मुदत वाढवून देण्यात आली. जलजीवन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची सुमारे ७० कोटी रुपयांची बिले मिळावीत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून निधी रखडल्याने कामे दिलेल्या मुदतीत कशी पूर्ण होणार, असा प्रश्न जिल्हा परिषदेला सतावत आहे.

२०१९ पासून ‘जलजीवन’ला सुरुवात

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची कामे सुरुवातीपासून जलद गतीने सुरू होती. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून वेळोवेळी कामांचा आढावा घेण्यात येत हाेता, तसेच ठेकेदारांना सूचना देण्यात येत होत्या.

जिल्ह्यात किती पाणी योजनांच्या कामांना मंजुरी?

जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १ हजार ४३२ पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर आहेत. त्यासाठी सुमारे १ हजार १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंजूर कामांपैकी काही ४३९ कामे पूर्ण झाली आहेत. तर ११६ कामे ० ते २५ टक्के, १८८ कामे २५ ते ५० टक्के, ३६६ कामे ५० ते ७५ टक्के काम झाले असून ३१९ कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

७० टक्के कामे प्रलंबित

जलजीवनअंतर्गत पाणी योजनांची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र, आता शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने कामे प्रलंबित राहिली आहेत.

५५ लिटर पाणीपुरवठा प्रतिदिन, प्रतिव्यक्ती

प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर प्रमाणे पाण्याची देणे अपेक्षित आहे.

सर्व तालुक्यात पाणीपुरवठ्याची कामे सुरू होती

जलजीवन मिशनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये कामे सुरू होती. त्यामुळे एकही तालुका नाही जेथे कामे सुरू झालेली नाहीत. मात्र, शासनाकडून निधी आलेला नाही.

उन्हाळ्यात पुन्हा डोक्यावर हंडा

जिल्ह्यात जलजीवनअंतर्गत एकूण १४३२ योजना राबविण्यात येत असून, त्यापैकी ४३९ कामे पूर्ण झाली आहेत. तर, ९८९ कामे अपूर्ण असल्याने उन्हाळ्यात पुन्हा महिलांच्या डोक्यावर हंडा येणार आहे.

Web Title: As the bills remained outstanding, the contractors stopped the work of Jaljeevan Yojana in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.