खेडमध्ये शिवसेना व कदम समर्थकांमध्ये जोरदार राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:05 IST2022-07-23T15:05:31+5:302022-07-23T15:05:57+5:30
बैठकीला शिवसेनेचे सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

खेडमध्ये शिवसेना व कदम समर्थकांमध्ये जोरदार राडा
हर्षल शिरोडकर
खेड : शिवसेनेतील अंतर्गत वाद अजून शमण्याचे नाव घेत नसून, आमदार योगेश कदम शिंदे गटात सामील झाल्यानंतर रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला. या घडामोडीचे पडसाद आज भरणे (ता. खेड) येथील शिवसेनेच्या बैठकीत उमटले. बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कदम समर्थक एकमेकांना भिडल्याने जोरदार राडा झाला. त्यानंतर जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी बैठकीतूनच काढता पाय घेतला.
दापोली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यातील साडेतीन जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक खेड तालुक्यातील भरणे येथे बिसू हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही बैठक शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. त्यामुळे बैठकीत उपस्थित कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांनी बैठक सोडून पळ काढला.
शिवसेना तालुका सचिव सचिन धाडवे यांनी आमदार योगेश कदम व माजी मंत्री रामदास कदम यांच्या समर्थनार्थ ठराव मांडावा अशी भूमिका घेतली. त्यावर कोणतीही भूमिका न घेता जिल्हाप्रमुख कदम यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत कदम समर्थकांनी अजिंक्य मोरे यांना हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच गाठून तंबी दिली.