राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 13:18 IST2019-09-09T13:18:25+5:302019-09-09T13:18:59+5:30
भास्कर जाधव यांनी आज सोमवारी आपल्या समर्थकांची एक बैठक चिपळूणमध्ये घेतली.

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला
चिपळूण : आपल्या समर्थकांसह आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केली. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार असून, त्यातील भास्कर जाधव यांचा शिवसेनाप्रवेश निश्चित झाल्याने हा राष्ट्रवादीला खूप मोठा धक्का ठरणार आहे.
भास्कर जाधव यांनी आज सोमवारी आपल्या समर्थकांची एक बैठक चिपळूणमध्ये घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना प्रवेशासाठी १३ सप्टेंबरचा मुहूर्त काढल्याचे सांगितले. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपण शिवसेनेत प्रवेश करू. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर आपला राग नाही आणि आपण त्यांच्याविरोधात काही बोलणार नाही. जर उध्दव ठाकरे यांनी संधी दिली तर गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवू, असेही ते म्हणाले.
गुहागर आणि चिपळूणमधील राष्ट्रवादीचे काही पंचायत समिती सदस्य, गुहागर तालुक्यातील ७३ सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गत निवडणुकीत तेव्हाचे राष्ट्रवादीचे आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीत भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.