गणपतीपुळेत दुसऱ्या दिवशीही एक बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 09:25 IST2025-10-26T09:25:25+5:302025-10-26T09:25:35+5:30
एकाचा मृतदेह हाती, दुसरा पेणचा तरुण अद्याप बेपत्ता

गणपतीपुळेत दुसऱ्या दिवशीही एक बुडाला
गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आलेला १८ वर्षीय निखिल शिवाजी वाघमारे (पुणे) शुक्रवारी सायंकाळी पोहण्यासाठी पाण्यात उतरला. त्याची बहीण निकिता व अन्य नातेवाईक किनाऱ्यावर होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने निखिल बेपत्ता झाला. त्याच्या नातेवाइकांनी जीव रक्षक व पोलिस यंत्रणेला ही माहिती दिली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आणि शनिवारी दुपारपर्यंत गणपतीपुळे पोलिस स्थानकाचे कर्मचारी, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने निखिलचा शोध सुरू होता. तो शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मालगुंड गायवाडी समुद्रकिनारी निखिल आढळला.
अडीच वर्षांच्या आयांशला वाचवले...
दुसऱ्या एका घटनेत पेण येथून आलेले नितीन शंकर पवार (३५) आपल्या कुटुंबासह समुद्राच्या पाण्यात उतरले. त्यांच्यासोबत त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा आयांश हाही होता. अचानक ते बुडू लागले.
किनाऱ्यावरील स्थानिक छायाचित्रकार रोहित चव्हाण यांनी हे पाहिले आणि त्यांनी लगेचच पाण्यात उडी घेतली. त्यांनी आयांशला वाचवले आणि किनाऱ्यावर आणले. मात्र नितीन पवार बेपत्ता झाले.
पर्यटक डॉक्टरने केले प्राथमिक उपचार
आयांशला किनाऱ्यावर आणले, तेव्हा त्याच्या नाकातोंडात पाणी गेले होते. त्याचवेळी पर्यटनासाठी तेथे आलेल्या डॉ. प्रणाली भरदारे भिवशी (निपाणी) यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व गणपतीपुळे येथे रिक्षाने ताबडतोब मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी पवार यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार करून त्यांची तब्येत स्थिर केली आणि अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले.