उद्धवसेनेचा कोकणातील आणखी एक माजी आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर
By मनोज मुळ्ये | Updated: March 5, 2025 21:13 IST2025-03-05T21:13:25+5:302025-03-05T21:13:57+5:30
एकनाथ शिंदे यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली असून, १३ मार्चला ते पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे.

उद्धवसेनेचा कोकणातील आणखी एक माजी आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर
मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, दापोली : पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे, नंतर राष्ट्रवादीतून आमदार झालेले आणि अलिकडेच उद्धवसेनेत प्रवेश केलेले दापोलीचे माजी आमदार आणि सध्याचे उद्धव सेनेचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख संजय कदम आता शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली असून, १३ मार्चला ते पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे.
माजी आमदार राजन साळवी, सुभाष बने यांच्यापाठेपाठ आता आणखी एक माजी आमदार उद्धवसेना सोडून शिंदेसेनेत जात आहे.
ज्यांच्याशी संजय कदम यांचा प्रमुख राजकीय वाद होता, ते माजी मंत्री रामदास कदम यांच्यासह त्यांनी स्नेहभोजनही घेतले असल्याची चर्चा आहे. रामदास कदम यांच्या पालखी बंगल्यावर संजय कदम आणि रामदास कदम यांचे एकत्रित स्नेहभोजन झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपली राजकीय वाटचाल सुरू करणारे संजय कदम त्या काळी रामदास कदम यांचे मानसपुत्र होते. मात्र त्यांच्याशी झालेल्या वादानंतर ते शिवसेनेतून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. २०१४ मध्ये ते दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार झाले. २०१९ मध्ये ते शिवसेना उमेदवार योगेश कदम यांच्यासमोर पराभूत झाले.
रामदास कदम आणि योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसातच संजय कदम यांनी उद्धवसेनेमध्ये प्रवेश केला आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा योगेश कदम यांच्याशी लढत दिली. त्यात त्यांचा पराभव झाला. आता ते शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सुभाष बने यांच्यापाठोपाठ आता आणखी एक माजी आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर जात असल्याने हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणखी एक धक्का ठरणार आहे.