बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्याला खासदार अमोल कोल्हेंनी दिली भेट; सरकारवर केला जोरदार प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 13:08 IST2019-09-20T13:05:29+5:302019-09-20T13:08:53+5:30
महाराष्ट्रातील ब संवर्गातील किल्ले लग्न किंवा कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा दुर्दैवी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्याला खासदार अमोल कोल्हेंनी दिली भेट; सरकारवर केला जोरदार प्रहार
मंडणगड : गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याच्या आपण निषेध करत असल्याचे उद्गार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काढले.
खासदार कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली आहे. मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्याला खासदार अमोल कोल्हे यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रायगडचे खासदार सुनील तटकरे, स्थानिक आमदार संजय कदम हेही उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ब संवर्गातील किल्ले लग्न किंवा कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा दुर्दैवी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले. गडकिल्ले मुळातच सुंदर आहेत. या किल्ल्याला तर समुद्राची पार्श्वभूमी आहे. तेथे वॉटर स्पोर्टस् सुरू करता येऊ शकेल. येथे शिवाजी महाराजांच्या जाज्वल्ल्य इतिहासाला उजाळा देता येईल. मात्र तसे न करता हे भाडेतत्त्वावर देण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे, असे ते म्हणाले.
किल्ल्याला भेट देऊन झाल्यावर त्यांनी मंडणगड नगर पंचायतीच्या इमारतीच्या गॅलरीमधूनच खाली जमलेल्या लोकांशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १ लाख ४२ हजार कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे लाखो हातांचा रोजगार बुडाला आहे. हे पाप भाजप आणि शिवसेनेच्या सरकारचे आहे, असा आरोप त्यांनी केला.