मोबाइलच्या जमान्यात क्वाॅइन बाॅक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’ थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:23+5:302021-09-05T04:35:23+5:30
शाेभना कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : भारतीय दूरसंचार निगमची अगदी खेडोपाडी असलेली क्वाॅइन बाॅक्स सेवा विविध कंपन्यांच्या भाऊगर्दीत ...

मोबाइलच्या जमान्यात क्वाॅइन बाॅक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’ थांबली
शाेभना कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : भारतीय दूरसंचार निगमची अगदी खेडोपाडी असलेली क्वाॅइन बाॅक्स सेवा विविध कंपन्यांच्या भाऊगर्दीत कालबाह्य झाली आहे. मात्र, दूरध्वनी सेवा अर्थात लॅण्डलाइन मात्र अजूनही आपले महत्त्व टिकून आहे.
जिल्ह्यात काॅइन बाॅक्सची कागदोपत्री नोंदविलेली संख्या ५५ असली तरी सध्या ही सेवा पूर्णपणे बंद आहे. अजूनही काही घरांमध्ये तसेच काही कार्यालयांमध्ये, संपर्कासाठी तसेच ब्राॅड बॅंड सेवेसाठी लॅण्डलाइन सेवेला अधिक प्राधान्य दिले जात असल्याने ही सेवा अजूनही आपले महत्त्व टिकून आहे. जिल्ह्यात पूर्वी ४० हजारांपर्यंत असलेल्या दूरध्वनींची संख्या आता केवळ सात हजार ६०० पर्यंत घटली आहे. मात्र काही घरांमध्ये दूरध्वनीचा वापर अजूनही होत आहे.
............
केवळ साडेसात हजार लॅण्डलाइन
पूर्वी घरात लॅण्डलाइन असणे प्रतिष्ठेचे मानले जात असे. त्याच्या स्वरूपात अनेक आधुनिक बदल होत गेले. घरात किंवा कार्यालयातील विविध विभागांमध्ये इंटरकाॅम स्वरूपात सेवा हे त्याचे आधुनिक रूप उदयास आले. त्यानंतर काही वर्षातच मोबाइल आले. त्यामुळे कुठेही सोबत नेणारे हे उपकरण लोकप्रिय झाले आणि लॅण्डलाइनची संख्या घटली. सध्या जिल्ह्यात केवळ ७,६०० इतके लॅण्डलाइन कार्यरत आहेत.
...............................
५५च क्वाॅइन बाॅक्स
मोबाइल अस्तित्वात येण्यापूर्वी ग्रामीण भागात दुकाने, हाॅटैल्स, कार्यालयांच्या बाहेर १ रुपयामध्ये काॅइन बाॅक्स ठेवला जात असे. १ रुपयाचे काॅइन टाकले की तीन मिनिटांचे संभाषण करता येत असे. बाहेर असताना हे एक प्रभावी माध्यम ठरत असे. मात्र, भ्रमणध्वनीचा जमाना सुरू झाला आणि खिशात मावणारे मोबाइल घेऊन कुठेही फिरता येऊ लागल्यामुळे अल्पावधीतच मोबाइल लोकप्रिय झाले. त्यामुळे मग १ रुपयातील काॅइन बाॅक्स सेवा हळूहळू मागे पडू लागली. आता केवळ ५५ काॅइन बाॅक्सची नोंद असली तरीही १ रुपयात सेवा देणारी ही यंत्रणा मोबाइलमुळे आता कालबाह्य झाली आहे.
...................
म्हणून लॅण्डलाइन आवश्यकच
लॅण्डलाइनवरून इतरत्र संपर्क करण्याबरोबरच इंटरनेट वापरासाठीही त्याचा उपयोग होतो. घरात लॅपटाॅप, काॅम्प्युटर यासाठी घरी असलेल्या लॅण्डलाइनवरून इंटरनेट सेवाही मिळते. तसेच घरातील सर्वच घटकांना यावरून कुठेही संपर्क करता येतो. त्यामुळे मोबाइल आले तरीही लॅण्डलाइन अजूनही तितकीच उपयोगाची आहे.
- राकेश कांबळे, रत्नागिरी
मोबाइलच्या आता कितीही खासगी कंपन्या आल्या तरीही खेडेगावांमध्ये, अगदी दुर्गम भागांमध्ये बीएसएनएलची लॅण्डलाइन सेवा संपर्काचे काम करीत होती. अजूनही ही सेवा सुरू आहे. खासगी कुठल्याच कंपन्यांची लॅण्डलाइन सेवा सुरू झालेली नाही. मात्र, बीएसएनएलची सेवा सरकारी असल्याने किफायतशीर आहे. त्यामुळे अजूनही टिकून आहे.
- विश्वनाथ कोलगे, जयगड, रत्नागिरी
.....................
मोबाइलमुळे घट
- भारतातील पहिली सरकारी संपर्क सेवा.
- खेडोपाडी जनतेपर्यंत पोहोचलेली यंत्रणा, आपत्तीच्या वेळी महत्त्वाची असलेली सेवा
- संपर्काची एकत्रित सेवा देणारी ही सुविधा मोबाइलचे आगमन होताच दुय्यम ठरली
- सध्या काॅइन बाॅक्स कालबाह्य झाले आहेत. मात्र काही ठिकाणी लॅण्डलाइन सेवा अजूनही सुरू आहे.