कृषी दिन विशेष: पतीच्या पश्चात शेतीच्या मातीत कोरली ‘सुवर्णा’क्षरे

By मेहरून नाकाडे | Updated: July 1, 2025 16:47 IST2025-07-01T16:45:47+5:302025-07-01T16:47:01+5:30

उच्चशिक्षित, MPSC पूर्व परीक्षा पास, लग्नानंतर यावे लागले खेडेगावात 

After the death of her husband Suvarna Milind Vaidya a highly educated woman from Ratnagiri who has passed the MPSC preliminary examination is doing good farming | कृषी दिन विशेष: पतीच्या पश्चात शेतीच्या मातीत कोरली ‘सुवर्णा’क्षरे

कृषी दिन विशेष: पतीच्या पश्चात शेतीच्या मातीत कोरली ‘सुवर्णा’क्षरे

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : उच्चशिक्षित, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पास, मात्र लग्नानंतर पुणे सोडून तालुक्यातील ‘रीळ’सारख्या खेडेगावात यावे लागलेल्या सुवर्णा मिलिंद वैद्य यांना खेडेगावाचा अनुभव नव्हता. मात्र त्यांनी मनापासून गावातील वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेतलं. पती मिलिंद वैद्य यांच्यामुळे त्यांना शेतीची गोडी लागली. दुर्दैवाने मिलिंद वैद्य यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. मात्र सुवर्णा यांनी न डगमगता पती करत असलेल्या शेतीमध्ये पूर्ण लक्ष घातले. कै. मिलिंद वैद्य यांनी भाताचे सर्वाधिक उत्पन्न घेण्याचा विक्रम केला होता. आता त्याच पावलांवर सुवर्णा यांनीही पाऊल ठेवलं आहे.

हेक्टरी अडीच टन भात उत्पादन घेत कै. मिलिंद यांनी तालुका, जिल्हा, राज्यपातळीवर पारितोषिके मिळविली होती. त्यांच्या निधनानंतर भातशेती उत्पादनाचे पहिलेच वर्ष असतानाही गतवर्षी सुवर्णा यांना सव्वादोन टन उत्पादन घेण्यात यश आले. सुधारित वाणामध्ये ‘रत्नागिरी आठ’ शिवाय पारंपरिक बियाणांमध्ये लाल तांदळासाठी कुडा, पटणी या वाणाची लागवड त्या करतात. खरीप हंगामात त्या १० ते १२ टन भाताचे उत्पादन घेतात.

भाताच्या बांधावर नाचणी, वरी, उडीद तर भात कापणीनंतर कुळीथ, मूग, पावटा, चवळी तसेच पालेभाज्याशिवाय दुधाळ जनावरांसाठी मका लागवड करत आहेत. केवळ पावसाळी शेतीच नाही तर उन्हाळ्यात आंबा उत्पादनही त्या घेतात. त्याशिवाय आमरस, अमृत कोकम, पन्ह, आगळ, आमसुले, फणसाचे गरे, तांदूळ पीठ, कुळीथ पीठ, नाचणी पीठ, तांदूळ, नारळ, खोबरे, सुपारी तसेच कडधान्यांची विक्री करतात.

दुग्धोत्पादन व्यवसाय

शेतीला पूरक दुग्धोत्पादन व्यवसायातही त्यांनी लक्ष घातले असून, १४ दुधाळ जनावरांचे संगोपन त्यांनी केले आहे. गावठी, गीर गायी, मुऱ्हा जातीच्या म्हशींचा त्यामध्ये समावेश आहे. दररोज ४० लिटर दुधाची त्या विक्री करतात. शिवाय तूप तयार करून त्याची विक्री करत आहेत. जनावरांचे शेणापासून कंपोस्ट खत, जिवामृत तयार करून शेतीसाठी वापरत आहेत.

मिलिंद वैद्य यांनी प्रगतिशील शेतकरी म्हणून नावलाैकिक मिळविला होता. २०१६ साली त्यांनी भाताचे विक्रमी उत्पादन घेत जागतिक स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांच्या पश्चात सुवर्णाताईंनी पतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी त्या विशेष परिश्रम घेत आहे. बारमाही शेती, पूरक प्रक्रिया व्यवसाय, दुग्धव्यवसाय विकसित करत असून, त्यांच्याकडे २० लोकांना दैनंदिन रोजगार मिळाला आहे. कोणत्याही पिकाचा लागवडपूर्व, पश्चात अभ्यास करून स्वत: मार्केटिंग करतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. - विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी

Web Title: After the death of her husband Suvarna Milind Vaidya a highly educated woman from Ratnagiri who has passed the MPSC preliminary examination is doing good farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.